स्व. डावखरे यांच्या निधनाने भरून न येणारी पोकळी निर्माण झाली – खा. शरद पवार

0
12
मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ),दि.5 – महाराष्ट्र राज्य विधिमंडळातील विधानपरिषदेचे उप सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते स्व. वसंत डावखरे यांच्या निधनामुळे भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे अशा शब्दात राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी शोक व्यक्त केला आहे.
खा. पवार म्हणाले की, माझे विश्वासू सहकारी स्व. वसंत डावखरे यांनी शिरूर सारख्या ग्रामीण भागातून येऊन ठाण्यासारख्या मोठ्या शहरात सार्वजनिक जीवनामध्ये आपला ठसा उमटवला. ठाणे हे साहित्य, कला, क्रीडा अशा सर्व क्षेत्राच सांस्कृतिक केंद्र समजले जाते. इथल्या लोकांमध्ये समरस होऊन वसंत डावखरे महानगरपालिकेमध्ये निवडून आले, त्यांनी महापौरपदाचा मान मिळवला. सर्व स्तरातील लोकांची साथ मिळवली. त्याचं राजकारण पक्षातीत होते. विधिमंडळात आल्यानंतर उप सभापती म्हणून त्यांची कारकीर्द विशेष गाजली. अतिशय निपक्षपातीपणाने त्यांनी काम केले. सर्वांमध्ये ते लोकप्रिय होते. त्यांचा निधनामुळे भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या कुटुंबीयांवर ओढवलेल्या या दुःखातून सावरण्यासाठी त्यांना बळ मिळो ही राष्ट्रवादी पक्ष व माझ्यातर्फे प्रार्थना करतो आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. असे  खा. पवार म्हणाले. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , विधानपरिषदेचे उप सभापती माणिकराव ठाकरे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, पोलीस आयुक्त परम बीर सिंग यांनी पुष्प वाहून त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी अनेक राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते, ठाण्यातील आमदार, लोकप्रतिनिधी तसेच राजकीय नेते, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. ठाणेचे पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की , त्यांच्याविषयी बोलतांना शब्द अपुरे पडतील असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. ते ठाण्याच्या विकासात नेहमीच मदत करीत राहिले. दरम्यान स्मशानभूमीत त्यांचे पुत्र प्रबोध आणि आमदार निरंजन डावखरे यांनी विधिवत त्यांच्या पार्थिवास अग्नी दिला. यावेळी पोलीस दलातील जवानांनी हवेत गोळीबाराच्या फैरी झाडून त्यांना अखेरची मानवंदना दिली. स्व. डावखरे यांचा दशक्रिया विधीचा कार्यक्रम १३ जानेवारीस शिरूर तालुक्यातील हिवरे गावी असल्यचे माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी आपल्या भाषणात जाहीर केले.

चौकट :–
@ विधानपरिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे यांच्या निधनाने राजकारणापलिकडे ऋणानुबंध जपणारा एक उमदा नेता आपण गमावला आहे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

@ ज्येष्ठ नेते व विधानपरिषदेचे माजी उपसभापती वसंतराव डावखरे  यांच्या निधनाने अजातशत्रू नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. –  खा. अशोक चव्हाण

@ स्व. वसंत डावखरे यांच्या रूपाने सत्ताधारी व विरोधी पक्षातला संवाद सेतु कोसळला असून राजकारणापलीकडे जाऊन सर्व पक्षात मैत्रीचा ओलावा जपणारा एक उमदा नेता या महाराष्ट्राने गमावला आहे –  भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आ. प्रसाद लाड

@ महाराष्ट्र विधान परिषदेचे  माजी उपसभापती तथा राज्यातील ज्येष्ठ नेते वसंत डावखरे यांच्या निधनाने राजकारणातील आजातशत्रू  हरपला आहे. – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले

@ स्व. वसंत डावखरे यांच्या निधनाने सर्वपक्षीयांशी आपुलकीचे नाते राखून असलेला, अजातशत्रु आणि एक अभ्यासू वक्ता आमच्या पक्षानेच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राने गमावला आहे – राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर