विकासाकडे नेणारे पारदर्शी सरकार देऊ – देवेंद्र फडणवीस

0
21

राज्यामध्ये आम्ही पारदर्शी व विकासाकडे नेणारे सरकार देऊ, अशी ग्वाही भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर दिली.

विधानभवनात भाजपा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मा. देवेंद्र फडणवीस यांची नेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. बैठकीस निरीक्षक म्हणून केंद्रीय गृहमंत्री व पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस जे. पी. नड्डा उपस्थित होते. पक्षाचे राज्याचे निवडणूक प्रभारी ओमप्रकाश माथूर, राष्ट्रीय सरचिटणीस राजीवप्रताप रूडी, पक्षाचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीश, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर व रावसाहेब दानवे, पक्षाचे प्रदेश पदाधिकारी, खासदार तसेच आमदारांच्या उपस्थितीत भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. भाजपाच्या मित्रपक्षांचे नेते खासदार रामदास आठवले, महादेव जानकर, विनायक मेटे व सदाभाऊ खोत यावेळी उपस्थित होते.

devendrafadnavis-3

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी राज्यातील जनतेला ग्वाही देतो की, हे आपले शासन असेल. आम्ही सगळेजण जनतेचे प्रतिनिधी म्हणून पारदर्शी व विकासाकडे नेणारे सरकार देऊ. छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेल्या मार्गाने व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेनुसार सरकारचे काम चालेल.”

देशाला विकासाची दिशा दाखविणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, ज्येष्ठ नेते राजनाथसिंहजी आणि केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे विशेष आभार. विधानसभा निवडणुकीत महत्त्वाची कामगिरी पार पाडणारे पक्षाचे निवडणूक प्रभारी ओमप्रकाश माथूरजी, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजीवप्रताप रूडीजी आणि पक्षाचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीशजी यांचे आभार, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

devendrafadnavis-2

ते म्हणाले की, या प्रसंगी मला दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची आठवण येते. त्यांचा आशीर्वाद आम्हाला प्राप्त झाला आहे.

विधिमंडळ पक्षनेतेपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी सुचविले व त्यांना पक्षाचे वरिष्ठ नेते विनोदजी तावडे, सुधीर मुनगंटीवार आणि पंकजाताई मुंडे यांनी अनुमोदन दिले.