तावडेंना बॉडीगार्डने खेचले सौजन्य: आयबीएन ७

0
22
वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबई -भाजपचा विधिमंडळ पक्षनेता निवडण्यासाठी मंगळवारी विधानभवन परिसरात मोठी लगबग सुरू असतानाच राज्यातील भाजपचे एक प्रमुख नेते विनोद तावडे यांना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या बॉडीगार्डने धक्काबुक्की केल्याचे उघड झाले आहे. तावडे राजनाथ यांच्याशी चर्चा करण्यासाठी त्यांच्या गाडीत चढण्याचा प्रयत्न करत असताना या बॉडीगार्डने त्यांना बखोटीला धरून खेचल्याचे व्हिडिओ फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. 
भाजप हायकमांडने नेतानिवडीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी दिल्लीतून राजनाथ सिंह यांना पाठवले होते. राजनाथ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ पक्षनेता म्हणून निवड करण्यात आली. यादरम्यान भाजपचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते आणि दिल्लीतून आलेल्या नेत्यांमध्ये बरीच खलबतं सुरू होती. त्यात विनोद तावडे हेही दिल्लीतील नेत्यांशी चर्चा करत होते. मात्र, राजनाथ बैठक आटोपून दिल्लीकडे निघाले असताना त्यांच्या गाडीतून जाण्यासाठी टाकलेले पाऊल तावडे यांना चांगलेच महागात पडले. 
राजनाथ यांच्या स्कॉर्पिओ गाडीभोवती त्यांच्या गार्ड्सचा गराडा होता. तो भेदून विनोद तावडे राजनाथ यांच्या गाडीत बसण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांना एका गार्डने रोखले. त्यामुळे तावडे व या गार्डमध्ये चांगलीच जुंपली. गाडीत भाजप नेते जे. पी. नड्डा हे आधीच बसलेले होते तर राजनाथ गर्दीतून आपल्या गाडीत बसण्यासाठी येत होते. त्यावेळी राजनाथ गाडीत बसण्याआधीच तावडे गाडीजवळ पोहोचले. तावडे यांनी गाडीचा मागचा दरवाजा उघडलाही होता. मात्र त्याचवेळी तेथे असलेल्या राजनाथ यांच्या गार्डने त्यांची बखोटी धरली. त्यामुळे या तावडे गार्डवर चांगलेच भडकले. पण, त्यानंतरही तावडे यांना गार्डने गाडीत प्रवेश दिला नाही. पुढच्याच क्षणी राजनाथ तेथे आले. तावडे यांनी त्यांच्याकडे गार्डची तक्रार करण्याचा प्रयत्न केला. मात्र राजनाथ यांनी त्याला फारसं महत्व दिलं नाही. तावडेंच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करून राजनाथ गाडीत बसून निघून गेले. याप्रकाराने तावडे राजनाथ यांच्यावर चांगलेच नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. ङआयबीएन ७ या वृत्तवाहिनीने तावडे आणि बॉडीगार्डमधील हे खटके चित्रित केले आहेत.