३ एप्रिलपासून बंगळुरूत भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक

0
10

नवी दिल्ली-भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक ३ आणि ४ एप्रिलला बंगळुरू येथे होत आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर होणारी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची ही पहिलीच बैठक आहे.
बंगळुरू येथील ललित अशोक या पंचतारांकित हॉटेलमध्ये ही बैठक होत आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरलीमनोहर जोशी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी, शहर विकास मंत्री व्यंकय्या नायडू, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील अन्य सदस्य, विविध राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीत मोदी सरकारच्या १० महिन्यांच्या काळातील उपलब्धींचा आढावा घेतला जाणार आहे. या वर्षी बिहार तर पुढील वर्षीच्या प्रारंभी पश्‍चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत, त्यादृष्टीनेही बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
२ एप्रिलला भाजपाच्या राष्ट्रीय पदाधिकार्‍यांची बैठक येथे होणार आहे. या बैठकीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवस कर्नाटकच्या राजधानीत मुक्कामाला राहणार आहेत. सामान्यपणे दर तीन महिन्यांनी भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होत असते. मात्र, यावेळची बैठक तब्बल ७ महिन्यानंतर होत आहे.