राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन पाटण्यात

0
18

नवी दिल्ली-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन ११ मे रोजी पाटणा येथे होत आहे. या अधिवेशनात पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची तसेच अन्य पदाधिकार्‍यांची निवडणूकही होणार आहे.
बिहारमध्ये यावर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणूक होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर या वर्षीचे राष्ट्रीय अधिवेशन आणि पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बिहारमध्ये घेण्याचा निर्णय राष्ट्रवादी कॉंग्रेसने घेतला आहे. १० वर्षांनंतर राकॉंचे राष्ट्रीय अधिवेशन बिहारमध्ये होत आहे. याआधी २००५ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन बिहारमध्ये झाले होते.या अधिवेशनात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची अध्यक्षपदी फेरनिवड होणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना झाल्यापासून शरद पवार पक्षाचे अध्यक्ष आहेत. पवारांसोबत पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकार्‍यांची निवडही या अधिवेशनात होणार आहे.
या अधिवेशनाला अध्यक्ष शरद पवार यांच्यासह खा. प्रफुल्ल पटेल, खा. सुप्रिया सुळे, अजित पवार, छगन भुजबळ यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संस्थापक सदस्य तारिक अन्वर बिहारचे आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस बिहार विधानसभेची आगामी निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार असल्याचे तारिक अन्वर यांनी सांगितले.
बिहारमध्ये होणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अधिवेशन हे नियमित आहे. दरवर्षी अधिवेशन आणि राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होत असते, ती यावर्षी पाटणा येथे होणार आहे, यात नवीन असे काहीच नाही, असे पक्षाचे ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.