दीड महिन्यांत दोनदा अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ

0
17

मुंबई,दि.30 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आणि पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यानंतर क्रमांक दोनचे नेते मानले जाणारे अजित पवार यांची यंदाच्या सत्ताकारणाच्या खेळात कमालच झाली आहे. याचे कारण म्हणजे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून त्यांनी दीड महिन्यांत दोनदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून दोनदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या अजित पवार यांनी सुरुवातीला भाजपासोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी त्यांनी अतिशय नाट्यमयरित्या पहाटे ८ वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर, चारच दिवसांत हे सरकार बहुमताअभावी कोसळले. त्यानंतर दीड महिन्याच्या कालावधीतच आज दुसऱ्यांदा अजित पवार यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतली. मात्र, यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात या पदासाठी शपथ घेतली. विधानसभा निवडणूक २०१९चा निकाल २४ ऑक्टोबर रोजी जाहीर झाला. यामध्ये भाजपाचे स्वबळाचे स्वप्न भंगलं. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाआघाडीनं गेल्या निवडणुकीपेक्षा चांगली मतं मिळवली. यामध्ये शिवसेना किंगमेकर ठरल्याने त्यांनी या संधीचा पुरेपूर फायदा घेतला. भाजपासोबत अडीज-अडीज वर्षे मुख्यमंत्री वाटून घेण्याची त्यांनी मागणी पूर्ण होऊ न शकल्याने अखेर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीसोबत सरकार स्थापण्याचा निर्णय घेतला.