हावडा-पुणे आझाद हिंद एक्स्प्रेसवर दगडफेक प्रवासी जखमी

0
16

नागपूर,दि.30ः-धावत्या रेल्वेगाडीवर अज्ञातांनी दगडफेक केल्याने एक प्रवासी जखमी झाला. ही घटना रविवारी सायंकाळी आझाद हिंद एक्स्प्रेसमध्ये घडली. जखमी प्रवाशी बिलासपूर येथे रेल्वेत अधिकारी आहेत.१२१३० हावडा-पुणे आझाद हिंद एक्स्प्रेस नागपूर रेल्वे स्थानकावर येण्याची वेळ दुपारी ०३.४५ ची आहे. मात्र ही गाडी आपल्या निर्धारीत वेळेपेक्षा ०१.४० मिनिटे उशिरा म्हणजे ०५.२० वाजता नागपूर रेल्वे स्थानकावर पोहोचली. नागपूरकडे येताना कळमना ते नागपूर रेल्वे स्थानकादरम्यान या गाडीवर दगडफेक करण्यात आली. यात या गाडीच्या इंजिनपासून तिसèऱ्या क्रमांकाच्या एसी टु टायरच्या ए -१ कोचची काच फुटली. बाहेरून मारलेला दगड खिडकीची काच फोडून आता आला व बर्थवरील प्रवाशाला लागला. ज्यांना हा दगड लागला ते सुदैवाने किरकोळ जखमी झालेत.

घटनेची माहिती गाडीतील तिकीट निरीक्षकाने रेल्वे नियंत्रण कक्षाला दिली. उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयात माहिती मिळताच उपस्टेशन व्यवस्थापक अतुल श्रीवास्तव, मनीष गौर, रेल्वे डॉक्टर, रेल्वे सुरक्षा बलाचे सहायक उपनिरीक्षक सुरेश कामीलकर, शशिकांत गजभिये, शेख शकील हे गाडी येण्यापूर्वी प्लॅटफॉर्मवर पोहोचले. गाडी सायंकाळी ०५.२० वाजता आली. परंतु तोपर्यंत दगड लागल्यामुळे किरकोळ जखमी झालेला प्रवासी गाडीतून उतरून निघून गेले होते.मात्र याच कोचमध्ये गोंदियावरून बसलेल्या एका प्रवाशाने काच फुटल्यामुळे दुसरीकडे बर्थ देण्याची मागणी केली. दुसरीकडे बर्थ मिळत नाही तोपर्यंत गाडी पुढे जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेऊन तब्बल पाच वेळा साखळी ओढून ही गाडी थांबविण्यात आली. या प्रवाशाची दुसरीकडे व्यवस्था करण्यात आली. फुटलेल्या काचेची दुरुस्ती केल्यानंतर सायंकाळी ०६.०५ वाजता आझाद हिंद एक्स्प्रेस पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली. चार वर्षांपूर्वीही नागपूर स्थानकानवरून गाडी सुटल्यानंतर अज्ञात व्यक्तींनी केलेल्या दगडफेकीत बैतुल येथील खुराणा नावाचा तरुण गंभीर जखमी झाला होता. त्यावेळी या तरुणाच्या डोळ्याला दगड लागला होता. या घटनेमुळे त्याची एका डोळ्याची दृष्टी कायमची अधू झाली. त्यामुळे दगडफेक करणाऱ्या सामजकंटकांचा बंदोबस्त करावा, अशी प्रवाशांची मागणी आहे.