सुरजागड लोहप्रकल्प जिल्ह्यात होणार नसेल तर लोहखनिज नेऊ देणार नाही:शिवसेनेचा इशारा

0
6

गडचिरोली,दि.30: सुरजागड येथील पहाडावर केवळ लोहखनिज उत्खनन केले जात असून, त्यातून केवळ दोनशे ते अडीचशे मजुरांना काम मिळत आहे. परंतु सुशिक्षित बेरोजगारांना कोणताही रोजगार मिळालेला नाही. कोनसरी येथे कारखाना न उभारता लोहखनिज दुसऱ्या जिल्ह्यात नेण्यात येत आहे. सुरजागड लोहप्रकल्प जिल्ह्यात होणार नसेल, तर लोहखनिज अन्यत्र नेऊ देणार नाही, असा सज्जड दम आज शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख व माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी यांनी पत्रकार परिषदेत दिला.पत्रकार परिषदेला जिल्हाप्रमुख राजगोपाल सुल्वावार, माजी जिल्हाप्रमुख विजय शृंगारपवार, वासुदेव शेडमाके, राजू कावळे, नंदू कुमरे, गोपाल चौधरी, हेमलता वाघाडे, राजू अंबानी, वेणूताई ढवगाये, सुनील पोरेड्डीवार, अरुण भांडेकर, विलास कोडाप, दिवाकर भोयर, दुर्गेश तोकला, शेखर उईके, कल्पना तिजारे, महेंद्र शेंडे, गजानन नैताम यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ.रामकृष्ण मडावी यांनी सांगितले की, नागपुरातील हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाबाबत येथील खासदार, आमदार व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची दिशाभूल केली. सुरजागड लोहप्रकल्प जिल्ह्यातच व्हावा, अशी आग्रही मागणी लोकप्रतिनिधींनी केली नाही. खरे तर, सुरजागडचे लोहखनिज ओरबडून टाकण्यात आले असून, ते चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गूस येथे नेण्यात आले. तत्कालिन सरकारने कारखाना उभारण्यासाठी लॉयड मेटल्स कंपनीला चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथे शेतकऱ्यांची जागा उपलब्ध करुन दिली. परंतु विविध प्रकारची नाहरत प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी ही कंपनी मुद्दाम दिरंगाई करीत आहे, असा आरोप डॉ. रामकृष्ण मडावी यांनी केला.

सुरजागड पहाडावरील उत्खननाच्या माध्यमातून केवळ मजुरांना काम मिळत आहे. मात्र, सुशिक्षित बेरोजगार अजूनही रिकामेच आहेत. कारखाना झाला तर त्यांना काम मिळेल; अन्यथा नाही. यापुढे पहाडावरुन लोहखनिज नेण्याचा प्रयत्न झाल्यास शिवसैनिक त्यास विरोध करतील, असा इशारा देताना डॉ.मडावी यांनी लवकरच शिवसैनिकांचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार असल्याचे सांगितले.माजी जिल्हाप्रमुख विजय शृंगारपवार म्हणाले की, सुरजागड पहाडावर प्रचंड वृक्षतोड करण्यात आली. रस्ते तयार करण्यासाठी तेथे लोहयुक्त गिट्टीचा वापर करण्यात आला. कारखाना जिल्ह्यात होऊ नये, असा लॉयड मेटल्स कंपनीचा प्रयत्न असून, शिवसेना तो हाणून पाडेल, असा इशारा शृंगारपवार यांनी दिला.