बुलडाणा,दि.08ः-बुलडाणा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्य़क्षपदासाठी आज बुधवारला झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेस,शिवसेना, राष्ट्रवादी व भारिप महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे.जिल्हा परिषदेच्या शिवाजी सभागृहात अध्यक्ष ,उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक पार पडली. महाविकास आघाडीच्यावतीने अध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या सौ मनीषा नितीन पवार यांनी तर उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या कमल जालिंदर बुधवत यांनी अर्ज दाखल केले. भाजपच्यावतीने ही दोन अर्ज दाखल झाले. मात्र ऐन वेळी भाजपने दोन्ही अर्ज मागे घेतल्याने हे निवडणूक बिनविरोध पार पडली. 59 पैकी महा विकास आघाडीच्या 35 सदस्यांची सभागृहात उपस्थिती होती. अधिकृतरीत्या घोषणा होताच कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी जल्लोष साजरा केला. यावेळी शिवसेनेचे आमदार डॉक्टर संजय रायमुलकर,आमदार संजय गायकवाड, काँग्रेसचे आमदार राजेश एकडे, शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत, काँग्रेसचे नेते राठोड, माजी जिप अध्यक्ष नरेंद्र खेडेकर, राष्ट्रवादीचे डी.एस.लहाने यांच्यासह विकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.





