39.4 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home राजकीय नागपूरातुन गृहमंत्री अनिल देशमुखांच्या पुत्राचा विजय;झेडपीत गडकरी, बावनकुळेंना धक्का

नागपूरातुन गृहमंत्री अनिल देशमुखांच्या पुत्राचा विजय;झेडपीत गडकरी, बावनकुळेंना धक्का

0
53

नागपूर,दि.08- राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घारत परत एकदा गुलाल उढळला जाणार आहे. अनिल देशमुखांचे चिरंजीव सलील देशमुख जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सलील देशमुखांनी नागपुरातील मेटपांजरा येथून विजयी मिळवला. नागपूर जिल्हा परिषद सदस्य म्हणून सलील देशमुख पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. तिकडे नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना धक्का बसला आहे. गडकरींचे मूळ गाव धापेवाडा येथून काँग्रेसचे महेंद्र डोंगरे विजयी झाले आहेत. तर बावनकुळे यांच्या कोराडी जिल्हा परिषद सर्कलमधून काँग्रेसचे उमेदवार नाना कंभाले विजयी झालेत.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घरच्या मैदानावर मोठा धक्का बसला आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या निकालाचा कौल भाजपाच्या विरोधात गेला आहे.

सलील देशमुख राष्ट्रवादीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. यापूर्वी अनिल देशमुखांनी विधानसभेसाठी मुलाची शिफारस केली होती. पण, विधानसभावारी हुकलेल्या सलील देशमुखांना जिल्हा परिषदेत झेंडा रोवण्यात यश आले आहे. नागपूरचा गड राखताना भाजपची चांगलीच दमछाक होत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने नागपुरात चांगली पकड घेतल्याचे दिसत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनाही धक्का बसला आहे.

राज्यातील सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचे निकाल आज लागणार आहे. नागपूर, धुळे, पालघर, नंदुरबार, अकोला आणि वाशिम या जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी १० वाजल्यापासून सुरुवात झालीय. या जिल्हा परिषद निकालांकडे सर्वच पक्षांचे लक्ष लागलं असून आजी-माजी मंत्र्यांसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दुसरीकडे राज्याचे आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांच्या पत्नी हेमलता पाडवी यांचा नंदूरबारमधील तोरणमाळ गटातून पराभव झाला आहे. शिवसेनेचे गणेश पराडके यांनी केला एक हजार मतांनी त्यांचा पराभव केला आहे. नंदूरबार जिल्हा परिषदेचे 56 गट आणि पंचायत समितीच्या 112 गणांसाठी सहा तालुक्यात मंगळवारी मतदान झाले होते. मतमोजणी सुरू असून संपूर्ण जिल्ह्यात धक्कादायक आणि अनपेक्षित निकाल समोर येत आहेत. धडगाव तालुक्यातील तोरणमाळ गटात प्रथमच निवडणूत लढणाऱ्या आदिवासी विकालमंत्री के.सी. पाडवी यांच्या पत्नी हेमलता पाडवी यांना पराभवाला सामना करावा लागला.
सर्वच जिल्हा परिषदांमध्ये आजी-माजी मंत्र्यांसह सर्वपक्षीय दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार धुळ्यात भाजपने एकहाती विजय मिळवला. मात्र भाजपला नागपूरचा गड राखता आला नाही. नागपुरात काँग्रेस आघाडीवर आहे. पालघरमध्ये शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला. तर अकोला आणि वाशिममध्ये त्रिशंकू स्थिती आहे.