गडचिरोली : राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची सर्कीट हाऊसमध्ये भेट घेऊन जिल्ह्यातील समस्या राज्यपालांना अवगत करून दिल्या, अशी माहिती खासदार अशोक नेते यांनी गुरूवारी गडचिरोली येथे आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान दिली.
वनकायद्यामुळे जिल्ह्यातील सुमारे २२ सिंचन प्रकल्पांचे काम रखडले आहे. देसाईगंज-गडचिरोली मार्ग मंजूर आहे. मात्र या मार्गासाठी राज्य शासनाच्या वाट्याचा निधी राज्य शासनाने दिला नाही. जिल्ह्यात ७८ टक्के जंगल आहे. भरपूर प्रमाणात खनिज साधनसंपत्ती उपलब्ध आहे. त्यामुळे या ठिकाणी उद्योग स्थापन करण्याचा फार मोठा वाव आहे. मेडीकल व आयुर्वेदीक कॉलेज स्थापन करण्यात यावे, ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करावे, नोकरी संदर्भातील ९ जून २0१४ च्या अधिसुचनेत बदल करण्यात यावा व त्यामध्ये स्थानिक नागरिकांना प्राधान्य देण्यात यावे, आदी मागण्या राज्यपालांकडे करण्यात आल्या. यावेळी राज्यपालांनी नोकरीसंदर्भातील अधिसूचनेत चार ते पाच दिवसांत बदल करण्यात येईल. वनरक्षक व परिचारिका ही दोनच पदे आदिवासींमधून भरण्यात येतील, असे आश्वासन राज्यपालांनी दिले असल्याची माहिती खासदार अशोक नेते यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली. यावेळी आमदार डॉ. देवराव होळी, आमदार क्रिष्णा गजबे, भाजपा जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, बाबूराव कोहळे आदी उपस्थित होते