38.9 C
Gondiā
Saturday, June 20, 2026
Home राजकीय नगराध्यक्षांनी राजीनामा द्यावा, अन्यथा अविश्‍वास आणणार-नगरसेवक धकाते

नगराध्यक्षांनी राजीनामा द्यावा, अन्यथा अविश्‍वास आणणार-नगरसेवक धकाते

0
50

भंडारा,दि.18-नगराध्यक्षानंतर खासदार म्हणून निवडून आल्याने सुनील मेंढे नगर परिषदेला वेळ देऊ शकत नाही. नगरसेवकांना व शहरवासीयांना ते वेळेवर भेटत नाही. यामुळे सुनील मेंढे यांनी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा त्यांच्यावर अविश्‍वास प्रस्ताव दाखल करु, अशी माहिती भाजप नगरसेवक नितीन धकाते यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली.
नितीन धकाते म्हणाले, १४ फेब्रुवारी रोजी भंडारा नगर परिषद सभापती पदाची निवडणूक झाली. त्यावेळी मी बंडखोरी केल्याचा आरोप माझ्यावर लावण्यात आला. मला कोणताही व्हीप मिळाला नव्हता. त्यामुळे बंडखोरी करण्याचा प्रश्नच नाही. याउलट नगराध्यक्ष सुनील मेंढे यांनी लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी ‘मी खासदार म्हणून निवडून दिल्यानंतर नगराध्यक्ष पदाचा राजीनामा देईन’ असे आश्‍वासन दिले होते. भाजपच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांनीसुद्धा ते राजीनामा देतील, असे सांगितले होते. मात्र, खासदार म्हणून निवडून आल्यानंतर सुनील मेंढे यांनी आपलाच शब्द फिरवला. आज त्यांच्याकडे खासदार, नगराध्यक्ष व नगर परिषद गटनेता असे तीन पद आहेत. त्यापैकी एकाही पदाचा राजीनामा देण्यास ते तयार नाहीत. त्यांनी नगराध्यक्ष व गटनेता या पदाचा राजीनामा दिल्यास भाजपमधीलच इतर दोघांना संधी मिळेल.
सुनील मेंढे हे खासदार म्हणून नेहमी कामात व्यस्त असतात. प्रभागातील कामासाठी त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केल्यास दोन- दोन आठवडे भेट होत नाही. आम्ही जनतेला दिलेल्या वचनांची पूर्तता करू शकलो नाही. नगराध्यक्षांना त्यांच्याच पक्षाचा उपाध्यक्ष आणि सभापती सुद्धा निवडून आणता आले नाही. मेंढे यांनी राजीनामा दिल्यानंतर पुन्हा भाजपाचाच अध्यक्ष बनेल, असेही ते म्हणाले.
२0१७ ते आजपर्यंत अध्यक्षांनी नगरपरिषद फंडमध्ये स्वत:च्या नातेवाईकाच्या नावाने असलेले आदित्य पंधरे नामे एंजसी लावून व तसा ठराव करून कोट्यवधी रुपयांच्या बिलाच्या रक्कमेची उचल करण्यात आली. आदित्य पंधरे व सुनील मेंढे यांच्या हितसंबंधाची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. स्वत:चे पोकलँड दुसर्‍याच्या नावाने लावून कोट्यवधी रुपयांचे बिल काढण्यात आले. मनर्मजीप्रमाणे ठराव वेळोवेळी बदलविले. नियमबाह्य कामे, शासनाने मंजूर केलेल्या शहराचा विकास प्रारूप नकाशात असलेले खेळाचे मैदान, हुतात्मा स्मारक या राखीव जागेवर नियमबाह्य कामे करणे, पाणीपुरवठा योजनेत दिरंगाई करणे, असे अनेक आरोप नितीन धकाते यांनी केले आहेत.

नगरसेवक धकाते यांनी लावलेले आरोप नैराश्यातून आहेत. सत्तेत आल्यापासून नगरात झालेली व सुरु असलेली ७0 कोटी रुपयांची विकास कामे आणली. मागच्या १५ वर्षात जे शक्य झाले नाही, ते करण्याचा प्रयत्न केला. सुरु असलेले पाणी पुरवठा योजनेचे काम, आज रस्त्यांच्या खोदकामामुळे नागरिकांना त्रासदायक वाटत असले तरी भविष्यात मोठी सोय करुन देणारे आहे. शहरात अनेक विकासाची कामे सुरु आहेत. हा विकास नव्हे का? नातेवाईकास काम देण्याचा आरोप बिनबुडाचा आहे. कायदेशीर जे नियमात बसले, तेच आम्ही केले. खासदार असलो तरी नगराच्या विकासाला प्राधान्यच आहे. नगरसेवकांना विश्‍वासात न घेताच ३ वर्ष पालिकेचा कारभार सुरु होता का? असा प्रश्न करीत उपाध्यक्ष होण्याची इच्छा असलेल्या धकाते यांच्यावर दाखल असलेले अनेक गुन्हे आणि झालेली तुरुंगवारी पाहता पक्षाने त्यांचा विचार केला नाही आणि याचाच राग म्हणून अशा पद्धतीचे आरोप होत असल्याचे नगराध्यक्ष सुनील मेंढे यांनी प्रतिक्रीया देताना स्पष्ट केले. धकाते यांनी केलेल्या आरोपींची चौकशी करुन घ्यावी, असेही ते म्हणाले.