केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात राज्यातील चंद्रपूरचे खा. हंसराज अहिर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सायंकाळी त्यांना अधिकृतपणे सांगण्यात आले. त्यांना कोळसा मंत्रालयाचा स्वतंत्र कार्यभार दिला जाणार असल्याचे संकेत मिळाले आहे. सध्या अहिर लोकसभेच्या कोळसा व खाण स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत.
त्यांच्या नावावर एकमत झाल्यांतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी गडकरींनी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. यानंतर ‘लोकमत’शी बोलताना अहिर म्हणाले, की माझ्या नावाचा विचार होणे हीच माझ्या कामाची पावती आहे. खात्याबाबत मला विचारणा झालेली नाही. मात्र कोळसा हा विषय आपल्या अभ्यासाचा आहे.
अहिर चारवेळा चंद्रपूर येथून विजयी झाले आहेत. २६ मे रोजी झालेल्या शपथविधीमध्ये त्यांच्या नावाचा समावेश असल्याचा निरोप दिला होता. पण ऐनवेळी गडकरी यांनी त्यांना प्रकाश जावडेकर यांच्या सहभागामुळे आपल्या नावाचा विस्तारात विचार केला जाईल, असा निरोप दिला होता. मात्र यावेळी विस्ताराच्या दोन दिवस आधी स्वत: गडकरी यांनी त्यांचा सन्मान केल्याने अहिर आनंदी दिसत होते.
चंद्रपूरचा दबदबा केंद्र व राज्य सरकारात सध्या चंद्रपूर जिल्ह्याचा दबदबा आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मूळचे चंद्रपूरच्या मूल येथील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार चंद्रपूरमधील बल्लारपूरचे आणि आता केंद्रीय मंत्री होणारे हंसराज अहिर चंद्रपूरचे खासदार आहेत.