राधाकृष्ण विखे काँग्रेस गटनेते,वड्डेटीवार उपनेते

0
17
वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबई -महाराष्ट्रातील सत्ता राखण्यात अपयशी ठरलेल्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मागच्या बाकावर बसवत काँग्रेसने पक्षाचं विधिमंडळातील नेतृत्व शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे दिलं आहे. राधाकृष्ण विखे हे पाच वेळा शिर्डीतून विधानसभेवर निवडून आले असून काँग्रेस आघाडी सरकारमध्ये त्यांनी विविध खात्यांची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळलेली आहे.

विखे घराणे पहिल्यापासूनच गांधी घराण्याच्या जवळचे राहिलेले आहे. त्यामुळेच राधाकृष्ण विखे यांचे वडील बाळासाहेब विखे-पाटील यांची मनमोहन सिंग यांच्या दोन्ही वेळच्या मंत्रिमंडळात वर्णी लावून काँग्रेस हायकमांडेने त्यांना निष्ठेचे फळ दिले होते. विखे घराण्याच्या याच एकनिष्ठतेमुळे आता राधाकृष्ण यांना राज्यात विधिमंडळ पक्षनेतेपदाची जबाबदारी देण्यात आल्याचे बोलले जात आहे.

काँग्रेस गटनेतेपदासाठी पृथ्वीराज चव्हाण, पतंगराव कदम, राधाकृष्ण विखे-पाटील यांची नावे चर्चेत होती. त्यात पृथ्वीराज यांनी आधीच आपण या जबाबदारीसाठी इच्छूक नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे पतंगराव की विखे अशी उत्सुकता होती. त्यात आज सकाळी सोनिया गांधी यांनी विखेंच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्याचवेळी पक्षाच्या उपनेतेपदाची जबाबदारी विदर्भातील आमदार विजय वडेट्टीवार यांच्याकडे देण्यात आली.

आघाडी सरकारच्या काळात राधाकृष्ण विखे नेहमीच मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत राहिलेले आहेत. नगर जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचा दबदबा आहे. आघाडी सरकारमध्ये विखेंनी शिक्षण, पणन-कृषी यांसारख्या महत्वाच्या खात्यांची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळलेली आहे.

विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार?

काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर राधाकृष्ण विखेंनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे आभार मानले. काँग्रेस आघाडी सरकारने अनेक लोकाभिमुख कामे केली आहेत. ती कामे नवे सरकार पुढे नेईल अशी आमची अपेक्षा असून सभागृहात एक प्रभावी विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस काम करेल, असा विश्वास विखेंनी व्यक्त केला. विरोधी पक्षनेतेपदाबाबत विचारले असता विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाईल, असे विखेंनी स्पष्ट केले.