मुंबई –
राष्ट्रवादीच्या पाठिंब्याबाबत शिवसेनेने भाजपला दिलेल्या अल्टिमेटमचे काय होणार?, शिवसेना विश्वासदर्शक ठरावावेळी काय भूमिका घेणार?, याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असताना शिवसेना विधिमंडळात विरोधी बाकांवरच बसणार असल्याचे स्पष्ट संकेत आज मिळाले आहेत. आजपासून सुरू झालेल्या राज्य विधिमंडळाच्या तीन दिवसीय विशेष अधिवेशनात शिवसेनेच्या आमदारांनी विरोधी पक्षाच्या बाकांवरच बसणे पसंत केले.
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन भाजपवर तोफ डागली होती. भाजप राष्ट्रवादीचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पाठिंबा घेणार आहे का?, हे स्पष्ट करावे अन्यथा आम्ही विश्वासदर्शक ठरावावेळी भाजप सरकारविरोधात मतदान करणार, असा इशारा उद्धव यांनी दिला होता. त्यावर तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त करत चर्चा ही पद, खाती, संख्या यावर नको ती तात्विक मुद्द्यांवर व्हावी, असे शिवसेनेला सुनावले होते. त्यामुळेच शिवसेना-भाजपमधील दरी वाढत जाणार याचे संकेत मिळाले होते.
शिवसेना आमदारांनी आज सकाळी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केले आणि त्यानंतर ते विधानभवनाकडे निघाले. सेनेचे आमदार भगवे फेटे बांधून विरोधी पक्षाच्या आविर्भावातच विधानभवनात अवतरले. विधिमंडळात प्रवेश केल्यानंतर शिवसेनेच्या आमदारांनी सत्ताधारी बाकांऐवजी विरोधी बाकांवरच आसनस्थ होणे पसंत केले. त्यामुळे अर्थातच भाजप आमदारांच्या भुवया उंचावल्या. विधिमंडळात सध्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सुरू असून उद्या, मंगळवारीही हा शपथविधी सुरू राहणार आहे. बुधवारी फडणवीस सरकारला विश्वासदर्शक ठरावाच्या अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.
भाजपशी चर्चा पूर्णपणे थांबली: गोऱ्हे
सत्तेतील सहभागाबाबत शिवसेना-भाजपमधील चर्चा पूर्णपणे थांबली असल्याचे विधिमंडळाबाहेर पत्रकारांशी बोलताना शिवसेना उपनेता निलम गोऱ्हे यांनी सांगितले. सत्तेसाठी शिवसेना कुणाच्याही मागे जाणार नाही, कमीपणा घेणार नाही, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कालच स्पष्ट केले असून पक्षाची अंतिम भूमिका तेच ठरवतील, असे त्या म्हणाल्या. शिवसेना विधानसभा अध्यक्षपदासाठी आपला उमेदवार देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी जिवा पांडू गावित यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या अध्यक्षतेखालीच पुढचे तीन दिवस विशेष अधिवेशनाचे कामकाज होणार आहे.