24.5 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home राजकीय माजी आमदार रामरतनबापू राऊत यांचे निधन

माजी आमदार रामरतनबापू राऊत यांचे निधन

0
3880

गोंदिया,दि.04ः-जिल्ह्यातील आमगाव-देवरी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार रामरतनबापू राऊत यांचे आज(दि.04)गोंदियातील बहेकार नर्सिग होम येथे उपचारादरम्यान निधन झाले.त्यांना हृदयविकाराचा आघात झाल्याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.त्यांच्या निधनामुळे जिल्ह्यातील आदिवासी जनतेतील मनमिळावू नेता हरपला गेला.

त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच देवरी तालुक्यात व आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रात नागरिकात व विशेषतः आदिवासी बांधवात शोककळा पसरली आहे. ते मृत्यूसमयी 71 वर्षाचे होते. एक तडफदार काँग्रेस नेते व अभ्यासू, आपल्या मतदारसंघातील समस्यांची जाण असणारा लोकप्रतिनिधी अशी त्यांची ख्याती होती.1978 ते 1985 मध्ये देवरी युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते.1985 ते 1995 भंडारा जिल्हा युवक काँग्रेसचे सहसचिव होते. तसेच देवरी तालुका खरेदी-विक्री सहकारी संस्थेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते. त्यांच्या मागे त्यांची पत्नी मिनाबाई राऊत , माजी जिल्हा परिषद सदस्य, दोन मुले व एक मुलगी असा बराच मोठा आप्त परिवार आहे.रामरतन बापू राउत यांच्या निधनामुळे आदिवासी समाजाचा खंबीर नेता हरपला आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नामदार नानाभाऊ पटोले यांनी त्यांच्या स्व गावी मोहांडी येथे जाऊन अंतिम दर्शन घेतले. गोंदिया जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष उषा मेंढे, जिल्हा परिषद सदस्य उषा शहारे, माधुरी कुंभरे , माजी जिल्हा परिषद सदस्य झासीलाल कटकवार, राजू काळे डॉ. देशमुख यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. त्यांच्या पार्थिवावर उद्या दिनांक 05 मे 2020 रोजी त्यांच्या स्वगावी मोहांडी चिचगड येथील स्थानिक मोक्ष धामावर सकाळी १०.३० वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.

आदिवासींचा सेवक हरपला-पालकमंत्री देशमुख यांनी व्यक्त केल्या दुःखद भावना

गोंदिया जिल्ह्यातील देवरी – आमगाव विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार रामरतनबापू राऊत यांच्या निधनाचे वृत्त कळताच दुःख झाले. रामरतनबापू राऊत यांनी दुर्गम, आदिवासीबहुल,नक्षलग्रस्त व मागास अशा देवरी -आमगाव क्षेत्राचे सन 2009 ते 2014 या कालावधीत नेतृत्व केले. देवरीसारख्या मागास भागात त्यांनी शासनाच्या अनेक योजना आदिवासी बांधवांसह लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविल्या. आदिवासी समाजातून आलेल्या रामरतनबापुनी आदिवासी बांधवांसोबतची आपली नाळ कधी तोडली नाही.प्रत्येक आदिवासी बांधव त्यांनी जपला. आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. शांत स्वभाव, मितभाषी आणि सामाजिक बांधिलकी जोपासणारा आदिवासी सेवक आपल्यामधून हरविला असल्याची भावना राज्याचे गृहमंत्री तथा पालकमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केली.