Home राजकीय शिवसेना – भाजपा युतीसाठी RSS ची मध्यस्थी

शिवसेना – भाजपा युतीसाठी RSS ची मध्यस्थी

0

नागपूर – भाजपा आणि शिवसेनेमध्ये युती व्हावी यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुढाकार घेतल्याचे वृत्त आहे. सरकार वाचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा टेकू घेण्यावरुन भाजपावर चोहोबाजूंनी टीका होत असतानाच आता मोहन भागवत मैदानात उतरल्याने भाजप – शिवसेनेमध्ये पुन्हा युती होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
सत्ता स्थापनेत शिवसेनेसोबतची चर्चा फिस्कटल्यावर भाजपाने आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव जिंकून सरकारला तारले आहे. भाजपाने उघडपणे राष्ट्रवादीचा पाठिंबा घेण्याची नाचक्की टाळली असली तरी भविष्यात राष्ट्रवादीच्या टेकूने सरकार चालवण्यास भाजपातील एक गट विरोधात आहे. तर शिवसेनेतील अनेक आमदारही सत्तेत सहभागी होण्यासाठी तयार आहेत. अखेरीस सरसंघचालक मोहन भागवत यांनी शिवसेना – भाजपमध्ये पुन्हा युती व्हावी यासाठी प्रयत्न सुरु केल्याचे समजते. यासंदर्भात उद्धव ठाकरे आणि भागवत यांच्यामध्ये फोनवर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑस्ट्रेलिया दौ-यावरुन परतल्यावर याविषयी सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासनही भागवत यांनी दिल्याचे एका वृत्तवाहिनीने म्हटले आहे. त्यामुळे भागवत शिवसेना – भाजपामध्ये समेट घडवण्याच यशस्वी होतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version