अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ महिला राष्ट्रीय रग्बी स्पर्धेवर मुंबई विद्यापीठाचे वर्चस्व

0
14

प्रथम पारितोषिक पटकावून मिळवला बहुमान

मुंबई, दि. १८ एप्रिल: असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई विद्यापीठाच्या वतीने बी. के. बिर्ला महाविद्यालय (स्वायत्त), कल्याण द्वारे आयोजित महिलांसाठी अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ रग्बी चॅम्पियनशिपवर मुंबई विद्यापीठाने प्रथम क्रमांक पटकावून बहुमान मिळवला आहे.  १२ एप्रिल २०२२ रोजी सेंच्युरी रेयॉन स्पोर्ट्स ग्राउंड (रामलीला मैदान) येथे सुरू झालेल्या या स्पर्धेत देशभरातील विविध राज्यांतील एकवीस विद्यापीठांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पाचशेहून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला. चार दिवस चाललेल्या या स्पर्धेतील ‘१५ खेळाडूंच्या साईड’मध्ये मुंबई विद्यापीठ, मुंबईच्या धाडसी मुलींनी लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, फगवारा-पंजाबचा पराभव करून प्रथम पारितोषिक पटकावले. यामध्ये लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, फगवारा-पंजाबचा संघ या स्पर्धेत दुसरा तर महाराष्ट्राच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संघाने तिसरा क्रमांक पटकावला. १५ एप्रिल २०२२ रोजी ही स्पर्धा संपन्न झाली. मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव सुधीर पुराणिक, डॉ. नरेश चंद्र, संचालक (शिक्षण) बी. के. बिर्ला महाविद्यालय (स्वायत्त), कल्याण, प्राचार्य डॉ. अविनाश पाटील, डॉ. मोहन एन. अमरुळे, संचालक, क्रीडा आणि शारीरिक शिक्षण, मुंबई विद्यापीठ, मुंबई, नाईट कॉलेजचे प्राचार्य आणि आयोजक डॉ. हरीश दुबे आणि राष्ट्रीय रग्बी संघाचे इतर मान्यवर, अनेक विद्यापीठे आणि महाविद्यालयांचे क्रीडा संचालक आणि प्राध्यापकांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.

या स्पर्धेत लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, फगवारा – पंजाबचा संघ ‘सेव्हन प्लेयर साइड’चा विजेता ठरला. या खेळात पाटलीपुत्र विद्यापीठ, पाटणा यांना द्वितीय तर शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरला तृतीय क्रमांक मिळाला. आता १८ मार्च ते २१ मार्च २०२२ या कालावधीत पुरुषांच्या रग्बी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत पंचेचाळीस विविध विद्यापीठे सहभागी होणार आहेत.