विनेश-साक्षीचा WFI अध्यक्षांवर लैंगिक छळाचा आरोप:जंतरमंतरवर कुस्तीपटूंचे धरणे

0
12

नवी दिल्ली--भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट आणि साक्षी मलिक यांनी बुधवारी रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे (WFI) अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. बृजभूषण सिंह हे भाजप खासदार असून त्यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला आव्हान दिले होते. तेव्हाही ते चर्चेत होते. विनेश फोगाट म्हणाली, ‘महिला कुस्तीपटूंचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह आणि प्रशिक्षक राष्ट्रीय शिबिरांमध्ये लैंगिक छळ करतात. राष्ट्रीय शिबिरांमध्ये नियुक्त केलेले काही प्रशिक्षक वर्षानुवर्षे महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ करत आहेत. अनेक महिला कुस्तीपटूंनीही याबाबत तक्रारी केल्या.

बजरंग पुनिया म्हणाला की, आमचा निषेध हा WFI आणि कुस्तीपटूंचे हित लक्षात न ठेवता ते जे काम करत आहेत त्याच्याशी आहे. याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही.

विनेशचा आरोप- जिवे मारण्याची धमकी दिली

विनेश म्हणाली- टोकियो ऑलिम्पिकमधील पराभवानंतर WFI अध्यक्षांनी मला ‘खोटा सिक्का’ म्हटले. मानसिक छळ केला. मी रोज आयुष्य संपवण्याचा विचार करायचे. कोणत्याही कुस्तीपटूला काही झाले तर त्याची जबाबदारी WFI अध्यक्षांवर असेल.विनेश इथेच थांबली नाही. ती म्हणाली- प्रशिक्षक महिलांचा छळ करत आहेत. परवानगीशिवाय पाणी प्यायले तरी फेडरेशन नाराज होते, अशी आमची स्थिती झाली आहे. आम्हाला जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. आम्हाला काही झाले तर त्याला अध्यक्ष जबाबदार असतील. आमचे करिअर पणाला लावून आम्ही इथे धरणे देत आहोत.

हे पहिलवान देत आहेत धरणे

  • बजरंग पुनिया, सोनिपत
  • विनेश फोगाट, भिवानी
  • साक्षी मलिक, रोहतक
  • सरिता मोर, सोनीपत
  • अमित धनखड़, रोहतक
  • सुजीत मान, झज्जर
  • सोमबीर राठी, सोनीपत
  • राहुल मान, दिल्ली
  • अंशु मलिक, जींद
  • सत्यव्रत कादयान, रोहतक
  • संगीता फोगाट
  • सोनम
  • जितेंद्र

आमच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ

डब्ल्यूएफआय देखील आमल्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करते आणि आम्हाला त्रास देते. ते आमचे शोषण करत आहेत. आम्ही ऑलिम्पिकला गेलो तेव्हा आमच्याकडे फिजिओ किंवा प्रशिक्षक नव्हता. दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी सांगितले की, आम्ही आवाज उठवल्यापासून आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत. खेळाडू खेळू शकत नाहीत म्हणून फेडरेशन जबरदस्तीने खेळाडूंवर बंदी घालते, असे विनेशने सांगितले.

मी 10 वर्षांपासून बोलण्याचा प्रयत्न करतेय

विनेश फोगाटने इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, मी जवळपास 10 वर्षांपासून फेडरेशनशी बोलून आमचे मुद्दे समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे, पण कोणीही ऐकायला तयार नाही.

WFI मध्ये असे लोक ज्यांना गेमबद्दल काहीही माहिती नाही

ऑलिम्पियन बजरंग पुनिया म्हणाला- आम्हाला महासंघ बदलायचा आहे. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) कुस्तीपटूंना त्रास देत आहे. जे लोक WFI चा भाग आहेत त्यांना या गेमबद्दल काहीही माहिती नाही. कुस्तीपटूंनी बराच काळ मूकपणे त्रास सहन केला, पण आता अध्यक्षांचे एकतर्फी निर्णय आम्ही खपवून घेणार नाही, असा निर्धार आम्ही केला आहे.

भारतातील सर्व अव्वल कुस्तीपटूंनी निर्णय घेतला आहे की, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत आणि WFI कडून आमच्याशी चांगली वागणूक मिळत नाही, तोपर्यंत ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होणार नाहीत. आम्ही पंतप्रधान कार्यालय आणि गृह मंत्रालयाकडे मदतीसाठी आवाहन करत आहोत.

हे खेळाडू राष्ट्रीय महासंघाच्या मनमानी वृत्तीला विरोध करत आहेत. महासंघ त्यांना डावलण्याचा प्रयत्न करत असल्याचे कुस्तीपटूंचे म्हणणे आहे. देशासाठी पदके जिंकूनही त्याला योग्य तो सन्मान मिळत नाही. कुस्तीपटू म्हणतात की, देशासाठी पदक जिंकल्यावर सर्वजण टाळ्या वाजवतात, पण त्यानंतर आपलं काय होतं हे कुणी पाहत नाही.

2022 च्या बर्मिंगहॅम गेम्समध्ये विनेश फोगटने सुवर्णपदक जिंकले होते.
2022 च्या बर्मिंगहॅम गेम्समध्ये विनेश फोगटने सुवर्णपदक जिंकले होते.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

दिव्य मराठीच्या सूत्रांनी सांगितले की, फेडरेशनने विशाखापट्टणम येथील सीनियर रेसलिंग चॅम्पियनशिपसाठी नवीन रेफरी मागवले होते. नवीन पंचांना नियम माहीत नव्हते. त्यांनी चुकीचे निर्णय दिले. त्यामुळे खेळाडूंमध्ये असंतोष पसरला असून भांडणेही झाली.

बजरंग पुनियाचे वैयक्तिक प्रशिक्षक सुजित मान यांनी एका सामन्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असता त्यांना महासंघाने निलंबित केले. सोनीपत येथील वरिष्ठ शिबिरात सुजित मान यांचे नाव नाही. महासंघाच्या अशा मनमानीमुळे धरणे आंदोलन करण्यात येत आहे.

कोण आहेत बृजभूषण शरण सिंह?

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह हे यूपीच्या बहराईच जिल्ह्यातील कैसरगंज लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत. ते आतापर्यंत सहा वेळा लोकसभेचे सदस्य म्हणून निवडून आले आहेत. उत्तर भारतीयांविरोधातील भूमिकेवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना अयोध्येत पाऊल टाकू देणार नाही, असे आव्हानही गतवर्षी त्यांनी दिले होते. यामुळेही ते चर्चेत होते.

अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रावरून याविषयी कळले – WFI सहाय्यक सचिवWFI विरुद्ध कुस्तीपटूंच्या निदर्शनावर, WFI सहाय्यक सचिव विनोद तोमर म्हणाले, मला माहित नाही की हे का सुरू आहे. सर्व कुस्तीपटूंनी WFI अध्यक्षांना पत्रं लिहिली आहेत, ज्यामध्ये मला या निदर्शनाबद्दल माहिती मिळाली. मी येथे त्यांच्या समस्या विचारण्यासाठी आलो आहे.

संपाचा राजकारणाशी काहीही संबंध नाही – बजरंग पुनिया

इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना बजरंग पुनिया म्हणाला, आमचा निषेध महासंघाविरोधात आहे. ते ज्या पद्धतीने काम करत आहेत त्याच्या विरोधात आहे. यामध्ये कोणतेही राजकारण नाही. आम्ही कोणत्याही नेत्याला येथे बोलावले नाही. ही केवळ कुस्तीगीरांचे निर्दशन आहे. जंतरमंतरवर जवळपास 12 पैलवान हातात तिरंगा घेऊन बसले आहेत.

जोपर्यंत निदर्शने सुरू आहेत, तोपर्यंत कोणताही खेळाडू स्पर्धा खेळणार नाही

बजरंग पुनिया म्हणाला की, भारतातील सर्व अव्वल कुस्तीपटू जो पर्यंत समस्या सुटत नाही तोपर्यंत कोणतीही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळणार नाहीत. फेडरेशन आमच्या कुस्तीपटूंना चांगली वागणूक देत नाही. सर्व कुस्तीगीरांची पंतप्रधान कार्यालय आणि गृहमंत्र्यांना आम्ही विनंती करतो की त्यांनी याविषयी आम्हाला मदत करावी. .

कुस्तीपटूंनी केले ट्विट

कुस्तीपटूंनी WFI विरोधात ट्विट करत त्यांच्या समस्या सांगितल्या. आता पाहा कुस्तीपटूंचे ट्विट…