एफ. सी. बायर्न महाराष्ट्र कप जिल्हास्तरीय स्पर्धेचे उद्घाटन   

0
12
वाशिम, दि.९ – जिल्हा क्रीडा संकुल वाशिम येथे एफ. सी. बायर्न ” महाराष्ट्र कप ” जिल्हास्तरीय स्पर्धेचे उद्घाटन आज करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे
 होते. उद्घाटन स्काऊट गाईडचे जिल्हा संघटक रामकृष्ण गावंडे यांनी केले.प्रमुख अतिथी म्हणून आकाशवाणीचे जिल्हा प्रतिनिधी सुनील कांबळे,जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता उपस्थित होत्या.
        श्रीमती गुप्ता प्रास्ताविकातून म्हणाल्या,एफ.सी.बायर्न महाराष्ट्र फुटबॉल कप जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा हया महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील १४ वर्षाआतील मुलांकरिता आयोजित करण्यात येत आहेत.या स्पर्धेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण करणे हा उद्देश आहे.राज्य शासनाने जर्मनी येथील एफ.सी.बायर्न क्लब (म्युनिक) यांच्यासोबत करार केला
आहे.या करारनाम्यानुसार जिल्हास्तरीय, विभागस्तरीय व राज्यस्तरीय स्पर्धेमधून राज्यातुन एकुण २० उत्कृष्ट फुटबॉल खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. निवडलेल्या २० खेळाडूंना एफ.सी. बायर्न क्लब जर्मनी (म्युनिक) या ठिकाणी फुटबॉलचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. निवड करण्यात आलेल्या
खेळाडूंना शासनामार्फत जर्मनी या देशात आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी येणे-जाणे खर्च,भोजन व निवास व्यवस्था तसेच प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा सर्व खर्च शासनामार्फत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
       श्री.गावंडे व श्री.खडसे यांनी आपल्या मार्गदर्शनात सर्व उपस्थित खेळाडूंना स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या. स्पर्धेचे उद्घाटन श्री.खडसे यांनी फुटबॉलला किक मारुन केले.या स्पर्धेत विजयी संघाला विभागस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याचा मान मिळणार आहे.स्पर्धा आयोजनाकरिता वाशिम जिल्हा फुटबॉल संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रफिक शेख यांनी विशेष सहकार्य केले आहे.तसेच फुटबॉल संघटनेचे पंच, लाईनमन व मार्गदर्शक यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.स्पर्धा आयोजनाकरीता क्रीडा अधिकारी कार्यालयातील क्रीडा
अधिकारी संतोष फुपाटे परिश्रम घेत आहेत.