महिला आपीएल लिलावासाठी गोंदियाच्या जान्हवीचे नाव

0
41

गोंदिया,दि.09ःस्थानिक मिस्टिक क्रिकेट अकादमीची खेळाडू जान्हवी रंगनाथनचे नाव आयपीएल लिलावासाठी निवडण्यात आले आहे.ती राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट स्पर्धेत जाणारी जिल्ह्यातील पहिली महिला खेळाडू ठरणार आहे.विशेष म्हणजे आज जान्हवीचे स्व.मनोहरभाई पटेल अकादमीच्यावतीने उत्कृष्ठ खेळाडू म्हणून सुवर्ण पदक देऊन उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. लिलावाची यादी बीसीसीआयने जाहीर केली आहे.लिलावासाठी नोंदणीकृत 1525 खेळाडूंपैकी 409 खेळाडू अंतिम झाले आहेत.246 भारतीय,163 परदेशी आणि 8 खेळाडू सहयोगी देशांचे आहेत. 202 कॅप्ड खेळाडू आणि 199 अनकॅप्ड खेळाडू आहेत, उर्वरित खेळाडू असोसिएट राष्ट्रांचे आहेत. पाच संघांना जास्तीत जास्त 90 स्लॉट उपलब्ध आहेत, त्यापैकी 30 परदेशी खेळाडूंठी आहेत.
लिलावात जान्हवीची मूळ किंमत 10 लाख असून तिचा अष्टपैलू खेळाडूंच्या श्रेणीत समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती मिस्टिक क्रिकेट अकादमी गोंदियातर्फे उपेंद्र थापा यांनी दिली.मुलींसाठी सातत्याने मोफत प्रशिक्षण शिबिरे सुरू असून नुकतीच विदर्भस्तरीय आंतर अकादमी महिला टी-20 स्पर्धा यशस्वीपणे पार पडली. जिल्ह्यात मिस्टिक्स क्रिकेट अकादमी क्रिकेटच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सतत कार्यरत आहे. प्रथमच जिल्ह्यातील एका खेळाडूचे नाव राष्ट्रीय स्तरावर अशाप्रकारे उदयास आले आहे, ही एक मोठी उपलब्धी आहे. जान्हवीने तिच्या यशाचे श्रेय तिचे कुटुंबीय आणि प्रशिक्षक उपेंद्र थापा यांना दिले.