सोनेगाव येथे अखिल भारतीय आंबेडकरवादी बहुजन साहित्य संमेलन

0
20

 प्रा. ज्ञानेश वाकुडकर उदघाटक तर सुप्रसिद्ध साहित्यिक युवराज गंगाराम संमेलनाध्यक्षपदी
पवनी-सोनेगाव/अड्याळ येथे दि.11फेब्रुवारी 2023 रोजी होत असलेल्या अखिल भारतीय आंबेडकरवादी बहुजन साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी गोंदिया येथील सुप्रसिद्ध साहित्यिक युवराज गंगाराम यांची निवड करण्यात आली आहे.तर उद्घाटक म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक आणि बहुजन चळवळीचे गाढे अभ्यासक प्रा. ज्ञानेश वाकुडकर, नागपूर यांची निवड करण्यात आली आहे.
समता सैनिक दल, सार्वजनिक बुद्धविहार सोनेगाव आणि आंबेडकरवादी बहुजन साहित्य चळवळ भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ नागपूरचे अखिल भारतीय आंबेडकरवादी बहुजन साहित्य संमेलन होत असल्याचे आयोजन समितीने याप्रसंगी जाहीर केले.
युवराज गंगाराम हे १९८४ पासून सातत्याने लेखन करीत आहेत.त्यांचे डायरी,काही राहिलेल्या नोंदी ,एक पूर्णविराम अनेक प्रश्नचिन्ह , द टॉर्च बेअरर असे चार कवितासंग्रह ,कवितेच्या तळाशी तत्वाभ्यास आणि दृष्टीक्षेपातील तत्वचिंतन असे दोन समीक्षा ग्रंथ, नेल्सन मंडेला द अनटोल्ड पोएजी या कवितासंग्रहाचे संपादन याशिवाय महात्मा आणि बाबासाहेब या वैचारिक पुस्तकाचे लेखन त्यांनी केले आहे. चौथ्या परिवर्तनवादी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि चौथ्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे ते उद्घाटक होते.विविध साहित्य संमेलनात ते सहभागी होते. मान्यताप्राप्त नियतकालिकांमधून त्यांनी सातत्याने लेखन कार्य केले आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शन केंद्रावरून त्यांनी कविसंमेलनात भाग घेतला आहे.
जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. दीपक कुमार खोब्रागडे , स्वागताध्यक्ष/आयोजक सिद्धचरण नंदागवळी, कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भगवान सुखदेवे आणि साहित्य संमेलनाचे मुख्य संयोजक तथा सचिव प्रा.डॉ. सुरेश खोब्रागडे प्रामुख्याने उपस्थित राहणार असून युवराज गंगाराम यांच्या निवडीबद्दल साहित्य क्षेत्रात आनंद व्यक्त केला जात असल्याचे प्रसिद्धी प्रमुख पत्रकार मनोहर मेश्राम यांनी कळविले आहे.