क्रीडा क्षेत्राच्या विकासात क्रीडा शिक्षकांची भूमिका महत्वाची – कादर शेख

0
12

 गोंदिया, दि.24 :- क्रीडा क्षेत्रात जागतिक पातळीवर प्रभुत्व संपादन करुन आपल्या देशाला जागतिक महासत्ता व शक्तीशाली राष्ट्र घडविण्याच्या प्रक्रियेत तसेच क्रीडा सुप्त गुणांना वाव देऊन खेळाडूंना घडविणे व क्रीडा विकासाला चालना देण्याचे महत्वपूर्ण कार्य क्रीडा शिक्षकांनी करावे. असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कादर शेख यांनी जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी केले.

         जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड, क्रीडा अधिकारी ए.बी.मरसकोले, तालुका क्रीडा अधिकारी ओमकांता रंगारी, राज्य क्रीडा मार्गदर्शक एन.एस.उईके यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.

        जिल्हास्तरीय क्रीडा शिबिराच्या माध्यमातून क्रीडा शिक्षकांना नाविण्यपूर्ण प्रशिक्षण देऊन क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, खेळाडूंमध्ये खेळाडूवृत्ती निर्माण करुन जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील खेळाडूंना राज्यस्तर व राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधीत्व करण्याची संधी निर्माण होणार आहे असे श्री. शेख यांनी यावेळी सांगितले.

        क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद गोंदिया यांच्या विद्यमाने क्रीडा शिक्षकांसाठी जिल्हास्तरीय क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल, गोंदिया येथे दिनांक 16 ते 23 मे 2023 या कालावधीत करण्यात आले होते. दिनांक 23 मे रोजी जिल्हास्तरीय क्रीडा प्रशिक्षण शिबिराचा समारोपीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

       या जिल्हास्तरीय क्रीडा प्रशिक्षण शिबिरामध्ये नविन खेळाची ओळख, खेळांमध्ये झालेले बदल, शास्त्रोक्त पध्दतीने तंत्रशुध्द प्रशिक्षण, खेळाडूंचा व्यक्तीमत्व विकास, खेळाडूंसाठी पोषक आहार, प्राथमिक उपचार, खेळाचे मनोविज्ञानाबद्दल व्याख्यान इत्यादी नाविण्यपूर्ण प्रशिक्षण देण्यात आले, सोबतच क्रीडा विभागाच्या क्रीडा प्रबोधिनी व क्रीडा विषयक विविध योजनांची विस्तृत माहिती देण्यात आली. या क्रीडा प्रशिक्षणामध्ये जिल्ह्यातील आठही तालुक्यातील 100 क्रीडा शिक्षक सहभागी झाले होते. तर यामध्ये 10 मास्टर ट्रेनरचा समावेश होता.

       यावेळी भौतिक चिकित्सा व व्यायामाचे महत्व या विषयावर डॉ.कांचन भोयर यांनी व खेळाचे मनोविज्ञान या विषयावर डॉ.महेंद्र संग्रामे यांनी सविस्तर माहिती क्रीडा प्रशिक्षणार्थी शिक्षकांना दिली.

        प्रास्ताविकेतून जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांनी जिल्हा क्रीडा संकुलामध्ये निरंतर आठ दिवस चाललेल्या क्रीडा प्रशिक्षणाच्या सोई-सुविधा व आयोजनाबाबत माहिती देऊन ते पुढे म्हणाले की, क्रीडा विकासासाठी शासनामार्फत राबविले जाणारे उपक्रम देशाची भावी पिढी बळकट व सामर्थ्यशाली बनविणे हा आहे. त्यामुळे क्रीडा विकासाच्या प्रवाहात सर्वांनी सामिल व्हावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

       सदर शिबिराच्या समारोप प्रसंगी मास्टर ट्रेनर्स पी.पी.खोब्रागडे, अमन नंदेश्वर, खुशाल पिंजरघरे, टी.ए.आलोत, मिलिंद रहांगडाले, अविनाश बंसोड, जितू पालांदूरकर, पंकज बोरकर, मनिषा शहारे यांचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन स्वागत करण्यात आले. तद्नंतर सर्व क्रीडा शिक्षक प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. यावेळी प्रशिक्षणार्थींनी आपले मनोगत व्यक्त केले.

        कार्यक्रमाचे सुत्रसंचालन क्रीडा अधिकारी ए.बी.मरसकोले यांनी केले तर उपस्थितांचे आभार राज्य क्रीडा मार्गदर्शक एन.एस.उईके यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धनंजय भारसाकळे, विनेश फुंडे, शिवचरण चौधरी, किसन गावळ, आकाश भगत, जयश्री भांडारकर यांनी परिश्रम घेतले.