समान संधी केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अडचणींचे निराकरण करावे – विनोद मोहतुरे

0
14

. समान संधी केंद्र कार्यशाळा

         गोंदिया, दि.24 :- अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ विहीत वेळेत अर्ज सादर करून घ्यावा. तसेच सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयामार्फत जिल्ह्यातील महाविद्यालयात समान संधी केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत. समाजकल्याण विभागामार्फत विद्यार्थ्यांकरिता राबविल्या जाणाऱ्या योजनांविषयी असलेल्या अडचणींचे निराकरण समान संधी केंद्रामार्फत करावे, असे प्रतिपादन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी केले. समाजकल्याण विभागामार्फत आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना व समान संधी केंद्र कार्यशाळेत ते बोलत होते.

    सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय यांच्याृमार्फत डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना व समान संधी केंद्र कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजकल्याणचे सहायक आयुक्त विनोद मोहतुरे होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण, नागपूर येथील सहायक लेखाधिकारी सहारकर, जि.प.गोंदिया येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी कादर शेख उपस्थित होते.

        कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व शाहू-फुले-आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून करण्यात आली.  मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात स्वाधार योजनेचा लाभ घ्यावा व महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील विविध योजनांची माहिती समान संधी केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना द्यावी. तसेच स्वाधार, शिष्यवृत्ती या योजनांबाबत मार्गदर्शनपर कार्यशाळा व व्याख्यान समान संधी केंद्रामार्फत आयोजित करावी, जेणेकरून मागासवर्गीय विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील गळती कमी होऊन विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होईल, असे आवाहन विनोद मोहतुरे यांनी केले.

    कुठल्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये व योजनांपासून विद्यार्थी वंचित राहू नये याकरिता विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या योजनांची माहिती समान संधी केंद्राच्या माध्यमातून महाविद्यालय प्रशासनाने द्यावी. असे माध्यमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी योजनांचा लाभ घेऊन योजनांची फलश्रुती करावी, असे सहायक लेखाधिकारी सहारक यावेळी म्हणाले.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजकल्याण कार्यालयातील कनिष्ठ लिपिक आशिष जांभूळकर यांनी केले. प्रास्तविकादरम्यान त्यांनी स्वाधार योजना व समान संधी केंद्राबाबत थोडक्यात माहिती विषद केली. यावेळी महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन समाजकल्याण निरीक्षक स्वाती कापसे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाजकल्याण कार्यालयातील कर्मचारीवृंद, क्रिस्टल प्राय.लि. व बीव्हीजी प्राय.लि. कंपनीचे कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.