दर्जेदार क्रीडा सुविधांसाठी राज्य शासनातर्फे भरीव मदत – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
9
सांगली, दि. 6 : खेळाडूंना चांगली क्रीडांगणे, दर्जेदार प्रशिक्षक मिळण्यासाठी तालुका, जिल्हा व विभागीय क्रीडा संकुलांना भरीव मदत करीत असल्याचे प्रतिपादन उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केले.
सांगली येथे न्यू उत्कर्ष क्रीडा व सांस्कृतिक मंडळ सांगली व सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका कबड्डी खेळाडू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 71 व्या पुरूष व महिला जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा 2023-24 स्पर्धेस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, आमदार सुधीर गाडगीळ, महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, उपायुक्त राहुल रोकडे व वैभव साबळे, माजी आमदार दिनकर पाटील, पद्माकर जगदाळे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेगवेगळ्या स्पर्धेतील यशस्वी व सहभागी खेळाडुंना बक्षिसे देण्यासाठी शासनाकडून भरीव आर्थिक तरतूद करीत असल्याचे सांगितले.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते क्रीडा संघटक नितीन शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मुलींच्या कबड्डी खेळातील पहिल्या तीन क्रमांकाच्या संघांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ट्रॉफी देवून सत्कार करण्यात आला. मुलींच्या कबड्डी संघामध्ये शिवाजी व्यायाम मंडळ वाळवा संघाने प्रथम क्रमांक, प्रोग्रेस आरग संघाने व्दितीय तर तरूण भारत व्यायाम मंडळ सांगलीवाडी संघाने तृतीय क्रमांक पटकविला. कार्यक्रमास खेळाडू, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.