आरती भगत व रोहित पटले महासंस्कृती मॅरेथॉन स्पर्धेचे विजेते

0
4

महासंस्कृती महोत्सवांतर्गत मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

पुरस्कारप्राप्त स्पर्धकांना योग्य बक्षीस व ट्रॉफी प्रदान

          गोंदिया, दि.16 : सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र राज्य व जिल्हा प्रशासन गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने १२ ते १६ फेब्रुवारी २०२४ दरम्यान आयोजित पाच दिवशीय ‘महासंस्कृती महोत्सव’ अंतर्गत 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 वाजता जिल्हा क्रीडा संकुल, गोंदिया येथे जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुलींमध्ये आरती भगत व मुलांमध्ये रोहित पटले यांनी महासंस्कृती मॅरेथॉन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. मॅरेथॉन स्पर्धेत तरुण-तरुणी, अधिकारी-कर्मचारी व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सदर स्पर्धेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन धावपटू मुन्नालाल यादव यांच्या हस्ते करण्यात आले.

         ही स्पर्धा 15 वर्षावरील मुला-मुलींसाठी नि:शुल्क होती. स्पर्धेतील मुलांची दौड 5 कि.मी. होती तर मुलींची दौड 3 कि.मी. होती. या स्पर्धेत जवळपास 600 स्पर्धक सहभागी झाले होते. सदर स्पर्धेत मुलांमध्ये प्रथम क्रमांक रोहीत पटले याने प्राप्त केला तर द्वितीय क्रमांक निखिल टेंभूर्णे व तृतीय क्रमांक भुपेंद्र बिसेन यांनी मिळविला. तसेच मुलींमध्ये प्रथम क्रमांक आरती भगत हिने प्राप्त केला तर द्वितीय क्रमांक सुषमा रहांगडाले व तृतीय क्रमांक प्रिया चनाप यांनी मिळविला.

         यावेळी मुला-मुलींमध्ये प्रथम पुरस्कार प्राप्त करणाऱ्या स्पर्धकाला 10 हजार रुपये, द्वितीय पुरस्कार 8 हजार रुपये व तृतीय पुरस्कार 5 हजार रुपये, ट्रॉफी, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. गौरी शुक्ला या छोट्या मुलीने स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल तिचा सुध्दा मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देवून गौरव करण्यात आला. या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. यावेळी जागृत सेलोकर, भौतिक नांदगावे व विनायक अंजनकर यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.

        कार्यक्रमास तहसिलदार समशेर पठाण, अपर तहसिलदार विशाल सोनवणे, राखीव पोलीस निरीक्षक रमेश चाकाटे, पोलीस निरीक्षक तिरोडा श्री. कठाळे, आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन धावपटू मुन्नालाल यादव, जिल्हा क्रीडा संघटक अनिल सहारे, जिल्हा योग असोशिएशनचे अध्यक्ष सुरेश कोसरकर, नॅशनल स्पोर्टस् ॲथॉरिटी कोच जागृत सेलोकर, ॲथलेटीक्स कोच भौतिक नांदगावे, समन्वयक विनायक अंजनकर यांचेसह स्पर्धक, खेळाडू व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार विनायक अंजनकर यांनी मानले.