विद्युत कंपन्यांच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे दि. २९ ते ३१ पर्यंत पुण्यात आयोजन

0
3

कबड्डी, कुस्ती व टेबल टेनिसच्या स्पर्धेसाठी ३० संघ सहभागी होणार
 गोंदिया, दि. २७ मे २०२४:* अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियामक मंडळाच्या ४५ व्या राष्ट्रीय कबड्डी, कुस्ती व टेबल टेनिस क्रीडास्पर्धेचे आयोजन बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात दि. २९ ते ३१ मे पर्यंत करण्यात आले आहे.

या राष्ट्रीय स्पर्धेत गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, उत्तराखंड, पंजाब, राजस्थान, दिल्ली, हिमाचल प्रदेशातील तसेच इतर खासगी अशा १४ वीज कंपन्यांचे ३० संघ व सुमारे ३५० खेळाडू सहभागी होत आहेत. कुस्तीसाठी ६ संघांमध्ये तसेच कबड्डी व टेबल टेनिसच्या अजिंक्यपदासाठी प्रत्येकी १२ संघांमध्ये लढत होणार आहे.
विद्युत कंपन्यांच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन बुधवारी (दि. २९) सकाळी ९.३० वाजता राज्याच्या ऊर्जा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सौ. आभा शुक्ला यांच्या मुख्य उपस्थितीत महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्याहस्ते होणार आहे. यावेळी राज्याचे क्रीडा आयुक्त राजेश देशमुख, एमएसईबी होल्डींग कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच महावितरण, महानिर्मीती, महापारेषण कंपनीचे संचालक मंडळ आणि अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियामक मंडळाचे अध्यक्ष जिग्नेश राय, सरचिटणीस नरेश कुमार, उपाध्यक्ष श्री. भारत पाटील, खजीनदार  ललित गायकवाड यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. तर शुक्रवारी (दि. ३१) सायंकाळी ५ वाजता अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अनबलगन (महानिर्मिती) व संजीव कुमार (महापारेषण) आणि स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षिस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे.

या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी प्रादेशिक संचालक अंकुश नाळे तसेच आयोजन समितीचे अध्यक्ष म्हणून मुख्य अभियंता राजेंद्र पवार (महावितरण) तर उपाध्यक्ष म्हणून मुख्य अभियंता अनिल कोलप (महापारेषण) व अधीक्षक अभियंता संजय भागवत (महानिर्मिती), मुख्य समन्वयक म्हणून मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके (महावितरण) व पुरुषोत्तम वारजुरकर (महानिर्मिती) आणि विविध समितीचे प्रमुख व सदस्य कार्यरत आहेत.