गोंदिया, दि.3 : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सामोरे जाण्यासाठी व जागतिक स्तरावरील स्पर्धेशी समायोजन करण्याची दूरदृष्टीता विचारात घेऊन खेळाडूंनी आधुनिक तंत्रज्ञानाचा व जागतिक स्तरावरील बदलांचा मागोवा घेणे आवश्यक असल्याचे मत जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे यांनी व्यक्त केले.
राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र व विविध खेळ संघटना गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल गोंदिया येथे 28 मे रोजी आयोजित विविध खेळांचे प्राथमिक कौशल्य विकास उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे समारोपीय कार्यक्रमात त्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होत्या. अमर गांधी, अनिल शहारे, विशाल ठाकुर, अंकुश गजभिये, नौसेन अली सय्यद, जागृत सेलोकर, विनेश फुंडे, रविना बरेले, रविंद्र वाळके, श्री. आलोत यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
सदर शिबिरामध्ये व्हॉलीबॉल, स्केटींग, क्रिकेट, सॉफ्ट-टेनिस, बास्केटबॉल, तलवारबाजी, कबड्डी, कराटे, योगा, ॲथलेटिक्स, टेबल टेनिस, बॅडमिंटन, जलतरण, सेपक टाकरा इत्यादी खेळामध्ये खेळाडूंनी मोठ्या प्रमाणात सहभागी होवून शिबिराचा लाभ घेतला. सदर शिबीर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी 15 ते 27 मे 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आले होते.
शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमात जिल्हा क्रीडा पुरस्कार्थी अनिल शहारे यांनी दहा दिवस चाललेल्या शिबिरा अंतर्गत खेळाडूंना नविन खेळाची ओळख, खेळामधील होणारे तांत्रिक बदल, प्रशिक्षणाच्या पध्दती अवगत करता आल्या असल्याचे सांगितले. तर विशाल ठाकुर यांनी क्रीडा शिबिरामुळे खेळाडू व नागरिकांमध्ये व्यायामाची आवड निर्माण करुन क्रीडा क्षेत्राला पोषक वातावरण निर्माण करण्यास सहाय्यभुत ठरत असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा अधिकारी ए.बी. मरसकोले यांनी केले, तर उपस्थितांचे आभार अंकुश गजभिये यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शेखर बिरनवार, किसन गावड, शिवचरण चौधरी, रवी परिहार, जयश्री भांडारकर, निकिता बोरकर यांनी परिश्रम घेतले.