गोंदिया, दि.12 : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गोंदिया व मदत व पुनर्वसन विभाग मंत्रालय मुंबई यांच्या तर्फे आयोजित महसूल पंधरवडाचे औचित्य साधून एक धाव सुरक्षेची या उपक्रमांतर्गत गोंदिया येथे मिनी मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली.
आपत्तीचे स्वरूप हे अनिश्चित असते त्यामुळे आपत्तीमध्ये नागरिक व विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असते, म्हणून दक्षता व जनजागृती हे आपत्ती व्यवस्थापनामध्ये महत्त्वाचे शस्त्र आहेत, असे मनोगत जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी यावेळेस केले.
या स्पर्धेला जिल्हाधिकारी प्रजित नायर, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, पोलीस उपअधीक्षक नंदिनी चानपूरकर, जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुढे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी यांनी युवकांना मार्गदर्शक सूचना करून फ्लॅग ऑफ करून स्पर्धेची सुरुवात केली.
विविध आपत्ती संदर्भात युवक व युवतींमध्ये जनजागृती व्हावी आणि त्यांनी सुरक्षिततेचे नियम पाळावे या हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये होमगार्ड, स्काऊट गाईड, एन सी सी, एन एस एस व विविध खेळाडू यांनी आपला सहभाग नोंदविला.
सदर स्पर्धेमध्ये पुरुष गटात प्रथम क्रमांक भुवन मंजुटे द्वितीय क्रमांक आदित्य सोनुले तित्रीय क्रमांक रितेश शेंडे व चतुर्थ क्रमांक योगेश चिखलंडे यांनी प्राप्त केला. तसेच मुलींमध्ये मयुरी ठाकूर प्रथम, मयुरी बडोले द्वितीय, ईशा मरस्कोले तृतीय व आसानी उईचे हिने चतुर्थी क्रमांक प्राप्त केले.
सदर महा मॅरेथॉन स्पर्धा सुव्यवस्थीतरित्या पार पाडण्याकरिता पोलीस विभाग, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव पथक, जिल्हा प्रशासनातील कर्मचारी यांनी सहकार्य केले.