छत्रपती संभाजीनगर,दि.१४ः-उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय टेनिस स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरचा प्रतिभावान खेळाडू प्रणव कोरडे याने नैसिक रेड्डी याच्या साथीने दुहेरीत उपविजेतेपद पटकावले.
प्रणव व नैसिक रेड्डी यांनी तृतीय मानांकित रहेमान फैजूर आणि अरोरा वंश यांना 6-2,6-2 नमवत उपांत्य फेरीत धडक मारली तसेच या जोडीने अतिशय उच्च दर्जाचा खेळ करून स्पर्धेमध्ये सणसनाटी निर्माण केली. त्यानंतर प्रणव व नैसिक रेड्डी या जोडीने उपांत्य फेरीत अव्वल मानांकित जगमीत आणि एकलव्य यांच्यावर 6-7(5), 6-4, 10-7 अशी मात केली. मात्र, अंतिम सामन्यात या जोडीला द्वितीय मानांकित माणिक शौर्य व गुप्ता तनिक यांच्याविरुद्ध अटीतटीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. माणिक शौर्य व गुप्ता तनिक यांनी अंतिम सामना 0-6, 6-4,10-4 असा जिंकत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. उपविजेतेपद पटकावणाऱ्या प्रणव कोरडे हा एक प्रतिभावान खेळाडू आहे याला प्रशिक्षक गजेंद्र भोसले यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सध्या प्रणव कोरडे हा आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या दृष्टीने तयारी करण्याच्या हेतूने बंगलोर येथील पीबीआय टेनिस अकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेत आहे.
. या कामगिरीबद्दल छत्रपती संभाजीनगरच्या अधिवक्ता परिषदेचे अध्यक्ष ॲड. श्रीकांत अदवंत व सीनियर कौन्सिल संजीवजी देशपांडे साहेब मुंबई उच्च न्यायालय खंडपीठाचे मुख्य सरकारी वकील ॲड. अमरजीत गिरासे यांनी प्रणव ज्ञानेश्वर कोरडे याचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.