- 64 उमेदवारांचे भाग्य मतदान यंत्रात बंद
- गोंदिया, दि.21 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 करीता जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात 20 नोव्हेंबर रोजी शांततेत मतदान झाले. जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील 64 उमेदवारांचे भाग्य मतदान यंत्रात बंद झाले.
जिल्ह्यातील 63-अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 70 टक्के मतदान झाले. यामध्ये 90 हजार 680 पुरुष तर 90 हजार 606 महिलांचा समावेश आहे. 64-तिरोडा विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 6 वाजेपर्यंत 65.20 टक्के मतदान झाले. यामध्ये 87 हजार 909 पुरुष तर 88 हजार 842 महिलांचा समावेश आहे. 65-गोंदिया विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 6 वाजेपर्यंत 71.07 टक्के मतदान झाले. यामध्ये 1 लाख 14 हजार 347 पुरुष व 1 लाख 17 हजार 37 महिलांचा तर इतर 1 मतदाराचा समावेश आहे. 66-आमगाव विधानसभा मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 72.42 टक्के मतदान झाले. यामध्ये 96 हजार 836 पुरुष तर 98 हजार 348 महिलांचा समावेश आहे. असे गोंदिया जिल्ह्यात एकूण सरासरी 69.74 टक्के मतदान झाले.
जिल्ह्यातील आमगाव व अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात मतदानाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत होती, तर गोंदिया व तिरोडा विधानसभा मतदारसंघात मतदानाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत होती. सद्या हिवाळ्याचे दिवस सुरु असल्यामुळे जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रात मतदान करण्यासाठी दुपारनंतर मतदारांचा मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला.
गोंदिया जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात एकूण 11 लाख 25 हजार 100 मतदार आहेत. यामध्ये 5 लाख 53 हजार 685 पुरुष मतदार आणि 5 लाख 71 हजार 405 स्त्री मतदार असून 10 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.
मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात एकूण 5 हजार 724 अधिकारी-कर्मचारी मतदान पथकात कार्यरत होते. जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रावर सेल्फी पॉईंटची व्यवस्था करण्यात आली होती. युवा मतदारांनी उत्साहाने मतदान करुन या सेल्फी पॉईंटसमोर आपली छायाचित्रे काढून ती समाजमाध्यमावर टाकली. जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी 10 मतदान केंद्रांचे व्यवस्थापन महिलांच्या हाती होती. या मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष ते पोलीस कर्मचारी देखील महिलाच होत्या. या निवडणूकीत महिलांनी मोठ्या उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावला.
जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात दिव्यांग व 85 वर्षावरील वयोवृध्द एकूण 481 मतदारांनी गृह मतदान केले, तर मतदान पथकात कार्यरत असलेले 6 हजार 450 अधिकारी-कर्मचारी यांनी पोस्टल बॅलेटद्वारे आपला मतदानाचा हक्क बजावला.
जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी सकाळी 8.00 वाजता फुलचूर येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रात जावून आपला मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यातील दिव्यांग व वयोवृध्द मतदारांना मतदान करता यावे यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या होत्या. यावेळी दिव्यांग व वयोवृध्द मतदारांनी देखील उत्साहाने मतदान केले. निवडणूक विभाग व पोलीस विभागाच्या समन्वयाने जिल्ह्यात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.