जागतिक दिव्यांग दिनानिमीत्त विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

0
11

गोंदिया येथे जागतिक दिव्यांग दिन साजरा

गोंदिया, दि.16 :  3 डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा 3 डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने जिल्हा समाज कल्याण, जिल्हा परिषद, गोंदिया व जिल्ह्यात कार्यरत दिव्यांगांच्या अनुदानित/विना अनुदानित/कायम अनुदानित शाळा/कार्यशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने 3 डिसेंबर 2024 या जागतिक दिव्यांग दिनानिमीत्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

        3 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 वाजता इंदिरा गांधी स्टेडियम ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत दिव्यांग विद्यार्थ्यांची प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. सदर रॅलीचे उद्घाटन समाज कल्याण समिती सभापती पुजा सेठ, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, जिल्हा समाज कल्याण अधिकारी दिलीप खोटेले यांनी केले व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रॅलीची सुरुवात केली. सदर रॅलीमध्ये गोंदिया जिल्ह्यातील आठ दिव्यांग शाळेतील एकूण 210 दिव्यांग विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

        त्यानंतर 3 डिसेंबरला जिल्ह्यातील दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन पोलीस मुख्यालय कारंजा येथे करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून समाज कल्याण समिती सभापती पुजा सेठ, कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी प्रजित नायर, तर विशेष अतिथी म्हणून जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम व पोलीस अधीक्षक गोरख भामरे उपस्थित होते.

         दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण आठ विशेष शाळांनी सहभाग घेतला. यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांचे विविध खेळ स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. यामध्ये 50 मीटर धावणे, 100 मीटर धावणे, गोळा फेक, लांब उडी इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या. सदर दिवशी दिव्यांग विद्यार्थ्यांसह सर्व उपस्थितांसाठी सकाळी नास्ता व दुपारी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला.

         4 डिसेंबरला दिव्यांग विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षिस वितरण सोहळ्याचे आयोजन पोलीस मुख्यालय मैदान कारंजा गोंदिया येथे सकाळी 11 वाजेपासून करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून समाज कल्याण समिती सभापती पुजा सेठ, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून समाज कल्याण समितीचे सदस्य हनुवंत वटी, छबुताई उके व विशेष अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्‍य कार्यकारी अधिकारी प्रमिला जाखलेकर उपस्थित होते.

         जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत प्रथम व द्वितीय आलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व बक्षिस वाटप करण्यात आले. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना व क्रीडा स्पर्धेत तृतीय आलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना सुध्दा मान्यवरांच्या हस्ते प्रोत्साहनपर बक्षिस वितरण करण्यात आले. त्यानंतर सप्ताहाचा समारोप कार्यक्रम संपन्न झाला.

        8 डिसेंबर रोजी जागतिक मतिमंद दिनानिमीत्त गोंदिया जिल्ह्यातील मतिमंद शाळांमध्ये मतिमंद मुलांच्या पालकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. अशाप्रकारे गोंदिया जिल्ह्यात जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला.