भोयर पवार महासंघातर्फे स्नेहमीलन मेळावा, गुणवंतांचा सत्कार
नागपूर-. संघटित असलेल्या समाजातून समाजाची ताकद दिसून येते. त्यामुळे संघटित होणे आवश्यक असून त्यातूनच समाजाची प्रगती साधता येते. अशा समाजाचे प्रतिनिधित्व करताना समाजाच्या संघटनेकडून शासनाकडून विधायक कार्य करवून घेता येते. परिणामी संघटनातून समाजाची एकता प्रदर्शित करण्याची ही खरी वेळ आहे, असा सूर मान्यवरांनी काढला.
अखिल भारतीय भोयर, पवार महासंघातर्फे रविवारी (दि. 15) नागपुरातील पवार नगरस्थित भोयर, पवार समाज भवनात गुणवंत विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक सत्कार, स्नेहमीलन सोहळा आणि वर-वधू परिचय मेळावा घेण्यात आला. त्यात मान्यवरांनी हे प्रतिपादन केले. उद्घाटन नागपूर महापालिकेचे उपायुक्त विजय देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी महासंघाचे डॉ. नामदेव राऊत होते. प्रमुख अतिथी म्हणून नवराष्ट्रचे वृत्त संपादक डॉ. गणेश खवसे, भोयर पवार विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष भगवान बन्नगरे, भाजपच्या वैद्यकीय आघाडीच्या प्रदेश महामंत्री डॉ. प्रीती मानमोडे, भोयर पवार विद्यार्थी मंडळाच्या महिला अध्यक्ष इंदिरा कालभूत, भाजपचे बिछुआ मंडळ अध्यक्ष लक्ष्मीकांत गोलू नागरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात दहावी, बारावी, पदवी-पदविका, पदव्युत्तरच्या गुणवंत विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिक, विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या समाजातील सदस्यांचा सत्कार करण्यात आला. कारंजा घाडगे येथील गुरुकुल शाळेच्या विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते ‘वाटचाल’ या समाजाच्या मुखपत्राचे तसेच उपवर-वधूंची माहिती असलेल्या ‘भविष्यातील वाटचाल’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
आयोजनासाठी आयोजनासाठी महासंघाचे अध्यक्ष डॉ. नामदेव राऊत, महामंत्री मधुकर चोपडे, कार्याध्यक्ष नामदेव पराडकर, सचिव मोरेश्वर भादे यांच्यासह सुभाष पाठे, डॉ. विजय पराडकर, शंकरराव पाठेकर, श्रावण ना. फरकाडे, डॉ. उदय चौधरी, युवक आघाडीचे अध्यक्ष किशोर चोपडे, कार्याध्यक्ष सागर हिंगवे, प्रवीण डोंगरे, रामेश्वर चोपडे, अरविंद देशमुख, नंदू ढोबाळे तसेच इतर सदस्यांनी सहकार्य केले. संचालन महासंघाचे सचिव मोरेश्वर भादे यांनी केले. ‘पवार मिशन’चा आढावा श्रावण ना. फरकाडे यांनी घेतला.
समाजाकडून मिळणारा सन्मान मोठा
ज्या समाजात वाढलो, त्या समाजाच्या संघटनेकडून आपला होणारा सन्मान हा सुवर्ण पदकापेक्षा मोठा असतो. त्यातून आपल्याला कार्य करण्याची ऊर्जा मिळते, असे मत नागपूर महापालिकेचे उपायुक्त विजय देशमुख यांनी व्यक्त केले. आपल्यालाही याच व्यासपीठावर गौरविण्यात आले होते, याची आठवण करून देत त्यांनी समाज संघटनेला कार्य करताना कोण-कोणत्या अडचणी येतात, याचा आढावा घेतला. आजच्या काळात समाजकारण करणे आवश्यक आहे. त्यासाठी त्याग आणि समर्पणाची भावना आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.