राज्य क्रीडा दिन उत्साहात साजरा: खेळाडूंना प्रेरणा आणि सन्मान

0
44

भंडारा, 15: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, भंडारा व विविध क्रीडा संघटनांच्या संयुक्त विद्यमाने ऑलिंपिकवीर स्व. खाशाबा जाधव यांच्या जन्मदिनानिमित्त “राज्य क्रीडा दिन” उत्साहात साजरा करण्यात आला.

जिल्हा क्रीडा संकुल, भंडारा येथे आयोजित या कार्यक्रमात क्रीडा रॅली, कुस्ती स्पर्धा आणि मॅराथॉन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. समारोप सत्रात जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांच्या हस्ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदकप्राप्त खेळाडू, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त क्रीडापटू आणि विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी यांना सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह आणि स्व. खाशाबा जाधव यांच्या जीवनचरित्रावर आधारित पुस्तक प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ, पोलीस निरीक्षक निलेश गीरी, जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे तसेच शिवछत्रपती पुरस्कारार्थी उपस्थित होते.

डॉ. कोलते यांनी स्व. खाशाबा जाधव यांच्या कार्याचा गौरव करत खेळाडूंना मार्गदर्शन केले. “क्रीडा क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी अथक परिश्रम, सातत्य आणि योग्य दिशेने प्रयत्न महत्त्वाचे आहेत,” असे त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. निखिलेश तभाने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश मोहरील यांनी केले, तर आभार प्रदर्शन अभय महल्ले यांनी केले. राज्य क्रीडा दिनाच्या निमित्ताने भंडारा जिल्ह्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा व नव्या पिढीला क्रीडा क्षेत्रात सहभागी होण्यासाठी प्रेरणा देण्याचा प्रयत्न करण्यात आला.