गोंदिया:कोहका-भानपूर जंगलात वाघाच्या बछड्याचा मृत्यू झाल्याचे मंगळवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आले होते.मृत वाघ हा टी -१४ चा बछडा असल्याचे निष्पन्न झाले. मंगळवारी दिवसभर कोहका-भानपूर जंगलातून त्या मृत वाघाला गोंदियातील कुडवा वन परिक्षेत्रात आणून शवविच्छेदन करण्यात आले होते.दरम्यान शवविच्छेदन अहवालातील माहितीनुसार सदर वाघाचे यकृत रक्तसंचयित, प्लीहा रक्तसंचयित, पृष्ठभागावर गाठी आढळल्या, त्याची फुफ्फुसे निकामी झाली होती. खूप रक्तसंचयित झाले होते, हृदय – पेरिकार्डियममध्ये द्रव साचलेले होते, तसेच रक्त गोठल्याने गंभीर संसर्ग होऊन त्याचा मृत्यू झाला. ही माहिती गोंदियाचे वनपरिक्षेत्राधिकारी दिलीप कौशिक यांनी दिली.भानपूर- कोहका जंगल परिसरात टी-१४ वाघाचा बछडा हा नव्याने दाखल झालेला वाघ होता. या परिसरात एनटी -३ ही वाघीण आणि इतर वाघ आहेतच. त्याच परिसरात नव्याने आलेला हा टी-१४ चा बछडा वावरत असल्याची माहिती वन विभागाला होती, पण तो आजारी आहे हे ग्रामस्थांना कसे कळले हाच प्रश्न वनविभागाने उपस्थित केला आहे.