दोन दिवसीय लातूर जिल्हास्तरीय महसूल क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन

0
9
लातूर, दि. 31 : जिल्हास्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसीय स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे आणि अर्जुन पुरस्कार विजेत्या सारिका काळे यांच्या हस्ते झाले.
प्रभारी अपर जिल्हाधिकारी संगीता टकले, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, अहिल्या गाठाळ, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, शरद झाडके यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. खो-खो मधील माजी राष्ट्रीय खेळाडू असलेले महसूल कर्मचारी हनुमंत जक्कलवार यांनी उपस्थितांना क्रीडा शपथ दिली.
जिल्हास्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत सांघिक व वैयक्तिक अशा एकूण ८० क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. लातूर, निलंगा, उदगीर, अहमदपूर, औसा-रेणापूर महसूल उपविभागातून प्रत्येकी एक आणि जिल्हाधिकारी कार्यालयाची एक अशा एकूण सहा संघांमध्ये या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी सर्व संघांचे पथसंचलन झाले. यामध्ये निलंगा उपविभागीय संघाने प्रथम क्रमांक पटकाविला, तर लातूर उपविभाग आणि उदगीर उपविभागाला अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळाला.
या स्पर्धेत खो-खो आणि हॉलीबॉलचे सामने झाले. तसेच क्रिकेटमध्ये निलंगा विरुद्ध उदगीर संघातील सामन्यात उदगीर विजयी ठरले. तसेच अहमदपूर विरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालय सामन्यात जिल्हाधिकारी कार्यालय विजयी ठरले. उपांत्य सामन्यात लातूर विरुद्ध उदगीर सामना होवून यामध्ये उदगीरच्या संघाने विजय मिळविला.