सहकारी बँकेच्या कर्मचारी भर्तीमध्ये सामाजिक आरक्षण नदारद

0
1684

बसपाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन व आंदोलनाचा इशारा

गोंदिया ता. 31:- येथील गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचारी भर्ती प्रक्रियेत सामाजिक आरक्षण वगळण्यात आले आहे. परिणामी ओबीसी, एससी आणि एसटी समाजावर अन्याय होणार असल्यामुळे ही भरतीप्रक्रिया रद्द करण्याची मागणी बहुजन समाज पक्षाने केली आहे.
बहुजन समाज पक्षाचे शिष्टमंडळ यांनी तहसीलदारांना भेटून मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आणि सहकार मंत्री व पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांना एका निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे.बहुजन समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील भरणे यांनी माध्यमाना सांगितलं की, मुळातच बँकेचे पदाधिकारी हे ओबीसी, एससी.,एसटी., प्रवर्गाचे विरोधी आहेत. त्यामुळे या प्रवर्गाला सामाजिक आरक्षणापासून वंचित करण्यासाठी बँकेने हा अन्यायकारी डाव रचला आहे.
बसपचे शिष्टमंडळाने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की,गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जारी केलेल्या नोकर भर्ती मध्ये एकूण 77 पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये द्वितीय श्रेणीची 5 पदे, लिपिक 47 व शिपाई 25 अशी 77 पदासाठी नोकरभर्ती करण्यात येणार आहे. यामध्ये इतर मागासवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच भटक्या विमुक्त जाती या समाजासाठी कुठेही सामाजिक आरक्षण ठेवण्यात आले नाही. यामुळे या प्रवर्गातील बेरोजगार तरुणांवर मोठा अन्याय होणार आहे. तेव्हा निवेदनाची दखल मुख्यमंत्री आणि सहकारमंत्री यांनी घेऊन जो पर्यंत या भर्ती प्रक्रियेत सामाजिक आरक्षण लागू करण्यात येत नाही तो पर्यंत ही भर्ती प्रक्रिया रद्द करण्याची जोरदार मागणी बहुजन समाज पक्षाने केली आहे.प्रसंगी तिव्र आंदोलन करण्याचा इशारा बसपने दिला आहे.शिष्टमंडळामध्ये जिल्हाध्यक्ष सुनील भरणे, एन. के. शेंडे, तेली समाज संघटनेचे संस्थापक संतोष खोब्रागडे, मनोज खोब्रागडे,डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अनंत टेम्भूरकर,सिद्धार्थ चंद्रिकापुरे, शहराध्यक्ष पंकज नागदेवे, नरेंद्र मेश्राम आणि इंजि. छोटू बोरकर यांचा समावेश होता.