
पिंपरी चिंचवड -महानगरपालिकेच्या वतीने आयोजित इं डियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशन व महाराष्ट्र बॉडी बिल्डर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच पिंपरी चिंचवड अमॅच्युअर बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या सहकार्याने ‘महापौर चषक ६३ वी राष्ट्रीय अजिंक्यपद व ६३ वी ज्युनियर शरीरसौष्ठव स्पर्धा २०२६’ या राष्ट्रीय स्तरावरील भव्य स्पर्धेला देशभरातील खेळाडूंचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे होणाऱ्या या स्पर्धेत विविध राज्यांमधून ४४५ पुरुष व ५० महिला खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे ही भव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे,विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपायुक्त पंकज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या या स्पर्धेत राष्ट्रीय दर्जाच्या या स्पर्धेत ज्युनियर व वरिष्ठ गटातील विविध वजनी प्रकारांमध्ये शरीरसौष्ठव, क्लासिक, फिजीक व फिटनेस प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. खेळाडूंकडून उत्कृष्ट शारीरिक बांधा, सादरीकरण कौशल्य, शिस्तबद्ध तयारी आणि कठोर परिश्रम यांचे प्रभावी प्रदर्शन केले जात आहे. परीक्षकांच्या उपस्थितीत प्राथमिक फेऱ्या, उपांत्य व अंतिम फेऱ्या नियोजनबद्ध पद्धतीने पार पडत असून स्पर्धेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.
या स्पर्धेमुळे पिंपरी चिंचवड शहरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले असून स्थानिक नागरिकांना राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंची कामगिरी प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळत आहे. महानगरपालिकेच्या क्रीडा विभागामार्फत स्पर्धेचे सुयोग्य नियोजन करण्यात आले असून खेळाडू, प्रशिक्षक व प्रेक्षकांसाठी आवश्यक सुविधा, निवास व तांत्रिक व्यवस्थेची योग्य तयारी करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेमुळे पिंपरी चिंचवड शहराची क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठा अधिक उंचावली जात आहे.





