भारत-पाक सामना ‘दूरदर्शन’वर दिसणार

0
11

नवी दिल्ली: विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या थेट प्रक्षेपणाचे हक्क घेण्यास ‘दूरदर्शन‘ला मनाई करणाऱ्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशास सर्वोच्च न्यायालयाने आज (मंगळवार) स्थगिती दिली. त्यामुळे येत्या रविवारी होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान या महत्त्वाच्या सामन्याचे थेट प्रक्षेपण ‘दूरदर्शन‘वरून करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

येत्या शनिवारपासून सुरू होणाऱ्या विश्‍वकरंडक स्पर्धेच्या प्रक्षेपणाचे हक्क ‘ईएसपीएन‘ आणि ‘स्टार टीव्ही‘कडे आहेत. त्यांच्याकडून देशभरातील केबल चालकांना प्रक्षेपणाचे हक्क दिले जातात. मात्र, हे ‘लाईव्ह फीड‘ ‘दूरदर्शन‘ने घेण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात मनाई केली होती. ‘दूरदर्शन‘ला दिलेल्या ‘लाईव्ह फीड‘मधून केबल चालकांना मोफत प्रक्षेपण करता येत असल्याने आमचे उत्पन्न बुडते,‘ असा दावा ‘बीसीसीआय‘, ‘ईएसपीएन‘ आणि ‘स्टार‘ने केला होता. त्यावर दिल्ली उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला होता. सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान या आदेशास 17 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. ‘दूरदर्शन‘ला थेट प्रक्षेपणाची सुविधा देण्यावरून 2007 पासून वाद सुरू आहे.