76 धावांनी पराभूत करत भारताने पाकला चारली धूळ !

0
10

ऍडलेड – विश्‍वकरंडक स्पर्धेच्या पहिल्या वहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवून आपल्या विश्वकरंडक अभियानाची विजयी सुरवात केली आहे. विश्वकरंडक स्पर्धांमध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध आपली विजयी मोहिम कायम ठेवताना, विश्वकरंडक स्पर्धांमध्ये मिळविलेला हा सहावा विजय आहे. बहुचर्चित सामन्यात भारताने पाकिस्तानचा 76 धावांनी पराभव केला. भारतभर विजयाचा जल्लोष साजरा करण्यात येत आहे. भारताकडून मोहंमद शमीने चार बळी घेतले. विराट कोहलीला शतकी खेळीबद्दल सामन्याचा मानकरी घोषित करण्यात आले.

अवघ्या क्रिकेट विश्‍वाचे लक्ष लागलेल्या भारत- पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा व शिखर धवन यांनी सावधपणे खेळत भारताला चांगली सुरवात करून दिली. पण, संघाच्या 34 धावा असताना रोहित शर्माला 15 धावांवर सोहेल खानने बाद केले. गेल्या काही सामन्यात खराब फॉर्ममधून जात असलेल्या शिखर धवनला या सामन्यात सूर गवसला. धवनने कोहलीच्या साथीने शतकी भागिदारी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याला कोहलीनेही अर्धशतक पूर्ण करत चांगली साथ दिली. धवनची शतकाकडे वाटचाल करत असताना 73 धावांवर मिस्बाच्या फेकीवर धावबाद झाला. त्यानंतर आलेल्या सुरेश रैनाने कोहलीला साथ देत शतकी भागिदारी केली. या दोघांनी भारताची धावसंख्या अडीचशेच्या पार नेली. दरम्यान कोहलीने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील 22 वे शतक पूर्ण केले. विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध शतक झळकाविणारा कोहली पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. मात्र, कोहली शतकानंतर फटकेबाजीच्या प्रयत्नात 107 धावांवर बाद झाला. त्याने 126 चेंडूत 8 चौकारांच्या साहाय्याने 107 धावा केल्या. सुरेश रैनानेही अर्धशतकी खेळी करत 74 धावा केल्या. मात्र, अखेरच्या पाच षटकांमध्ये भारतीय फलंदाजांना धावा करण्यात अपयश आले. कर्णधार धोनी, रवींद्र जडेजा, अजिंक्‍य रहाणे हे झटपट बाद झाल्याने भारताला 300 धावांच करता आल्या. पाकिस्तानच्या सोहेल खानने पाच बळी मिळविण्याची कामगिरी केली.

भारताच्या 301 धावांच्या आव्हानापुढे पाकिस्तानची सुरवात खराब झाली. मोहंमद शमीने उसळत्या चेंडूवर सलामीवीर युनूस खानला 6 धावांवर बाद केले. त्यानंतर अहमद शहजाद व हॅरिस सोहेल यांनी अर्धशतकी (68 धावा) भागिदारी करत भारतीय गोलंदाजांना यश मिळू दिले नाही. जलदगती गोलंदाज अपयशी ठरत असल्याचे पाहून कर्णधार धोनीने फिरकीपटूंना गोलंदाजीस आणले. धोनीचा हा प्रयत्न यशस्वी ठरला. आर. आश्विनने सोहेलला 36 धावांवर स्लीपमध्ये रैनाकरवी झेलबाद केले. शहजादने कर्णधार मिस्बाच्या साथीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, उमेश यादवच्या गोलंदाजीवर पॉईंटवर उभ्या असलेल्या जडेजाने शहजादचा सुरेख झेल टिपला. शहजाद 47 धावांवर बाद झाला. त्याच षटकात उमेश यादवने शोएब मकसूदला भोपळाही न फोडता स्लीपमध्ये झेलबाद केले. त्याच्या पुढच्याच षटकात जडेजाच्या गोलंदाजीवर उमर अकमलला धोनीने झेलबाद केले. धोनीने हा निर्णय तिसऱ्या पंचांवर सोपविला होता. अखेर तिसऱ्या पंचांनीही अकमलला बाद ठरविले. त्यानंतर वाहब रिसाझही धोनीकडे झेल देऊऩ बाद झाला. कर्णधार मिस्बाने 76 धावा करत एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न केला. पण, पाकिस्तानचा एकही फलंदाज त्याला साथ देऊ शकला नाही. अखेर पाकिस्तानचा डाव 224 धावांत संपुष्टात आला.