सौर, पवन उर्जाक्षेत्रावर अधिक भर हवा: मोदी

0
14

नवी दिल्ली – पारंपारिक उर्जास्त्रोतांच्या वाढत्या आयात खर्चाच्या पार्श्‍वभूमीवर स्वस्त वीजेसाठी सौर व पवनउर्जेसारख्या अपारंपारिक संसाधन क्षेत्रांमध्ये नावीन्यपूर्ण संशोधनाची आवश्‍यकता असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) अधोरेखित केले. अपारंपारिक क्षेत्रामधील जागतिक गुंतवणुकदारांच्या पहिल्यावाहिल्या परिषदेचे उद्‌घाटन पंतप्रधानांनी आज केले. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी अखंडित सौरउर्जेचे वरदान लाभलेल्या 50 देशांनी या क्षेत्रामध्ये अधिकाधिक तांत्रिक सुधारणा घडवून आणण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन केले.

“विकासाच्या मार्गाकडे आम्हाला अधिकाधिक वेगाने मजल मारावयाची आहे. यासाठी आखावयाच्या योजनेमध्ये उर्जाक्षेत्राचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. या पार्श्‍वभूमीवर गरीबांच्या आयुष्यामध्ये प्रकाश आणून त्यांच्या आयुष्यामध्ये बदल सकारात्मक बदल घडविण्यासाठी आम्ही अपारंपारिक उर्जाक्षेत्रावर लक्ष केंद्रित करतो आहोत. आपल्याकडे अनेक तलाव आहेत. या तलावांवर सोलर पॅनेल्स लावता येणार नाहीत काय?.. आपल्याला नावीन्यपूर्ण मार्गांचा विचार करावयास हवा,‘‘ असे पंतप्रधानांनी सांगितले.

“””सोलर फोटोव्होल्टिक सेल‘ची किंमत ही प्रतियुनिट 20 रुपयांवरुन साडेसात रुपयांपर्यंत खाली आली आहे; व नावीन्यपूर्ण संशोधनामुळे ही किंमत आणखी कमी होऊ शकेल. वीजउत्पादनाचा खर्च आणखी कमी करण्यासाठी सौर व पवन उर्जेचा एकत्रित वापर करुन वीजनिर्मिती करण्यावर अधिक भर द्यावयास हवा,‘‘ असे प्रतिपादन मोदी यांनी केले.