भाजीपाला शेतीतून आत्मनिर्भर कविता झोडे यांची प्रयोगशील शेती

0
28

यशोगाथा-

 प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी शेती हे अत्यंत फायदयाचे क्षेत्र ठरत आहे. नियमीत नवनवे प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना शेती साथ देते. पारंपारिक पीक पध्दतीला शेती साथ देईल असे होत नाही. हीच प्रयोगशिलता डोंगरगाव ता.देवरी येथील श्रीमती कविता लेखराम झोडे या महिला शेतकऱ्याने जोपासली व भाजीपाला शेतीतून लाखोचे उत्पन्न मिळविले. भाजीपाला शेतीचा हा प्रयोग नगदी पिकाचा आहे. कविता या प्रयोगातून आर्थिक सक्षम व आत्मनिर्भर झाल्या आहेत. सन 2017-18 पासून भाजीपाला शेती करीत आहे. ही शेतकरी आता आजुबाजूच्या परिसरात एक उत्कृष्ट अशी शेतकरी बनली आहे.

          डोंगरगाव हे गाव तालुका स्थळापासून 20 किलोमीटर अंतरावर देवरी-आमगाव रस्त्यावर आहे. सदर शेतकरी पुर्वी पारंपारीक शेती करीत होती. यामध्ये फक्त भात पिकाचीच लागवड खरीप हंगामामध्ये करीत होती. परंतू बाजारात निविष्ठांची वाढती किंमत तसेच रोवणीच्या काळात मजुरांचा अभाव यामुळे भात शेतीमध्ये खर्च जास्‍त करुन सुध्दा उत्पादन पाहिजे त्या प्रमाणात मिळत नव्हते. अशावेळी आपण काय करावे हे त्यांना सूचत नव्हते. तेव्हा त्यांना कृषि विभागाच्या एका प्रशिक्षण कार्यक्रमातून भाजीपाला शेतीविषयी माहिती मिळाली. नंतर त्यांनी थेट कृषि विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला व याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. नंतर त्यांनी निश्चिय केला की, आपण आता भात शेती फक्त खाण्यापुरती करावी व बाकीच्या क्षेत्रावर भाजीपाला पिकाची लागवड करावी.

          सुरुवातीला त्यांनी शेतामध्ये पाण्याकरीता बोअरवेल खोदून घेतले व त्यांना त्यामध्ये समाधानकारक पाणी सुध्दा मिळाले. नंतर त्यांनी भात खाचरातील बांध तोडून जमीन सपाटीकरण करुन घेतले व कृषि विभागाच्या सुक्ष्म सिंचन योजनेतून ठिबकसंच बसवून घेतले. तसेच बेडवर आछादनाकरीता मल्चिंगची सुध्दा योजना त्यांनी कृषि विभागातून घेतली. सुरुवातीला त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या क्षेत्रामधून फक्त 1 एकर क्षेत्रावर भाजीपाला पीक वांगी, मिरची ची लागवड सन 2017-18 मध्ये केली. सदर क्षेत्रातून निघालेले उत्पन्न हे देवरी येथील बाजारपेठेत विक्री केले. त्यांना योग्य भाव मिळाला व भात शेतीपेक्षा 8 ते 10 पटीने पैसे सुध्दा जास्त मिळाले. त्यांना याचा समाधान वाटला आणि त्यांनी पुढच्या हंगामात एक एकर ऐवजी दोन एकर क्षेत्र हे भाजीपाला पिकाखाली आणले व त्यामध्ये वांगी, टमाटर, कारली, काकडी, भेंडी, मिरची इत्यादी वेगवेगळे भाजीपाला पिकाची थोड्या थोड्या क्षेत्रात लागवड केली व त्यापासून त्यांना आर्थिक नफा मिळत गेला.

          भात शेतीपासून त्यांना वर्षातून फक्त 20 ते 30 हजार रुपये प्रती हेक्टरी नफा मिळत होता. परंतू भाजीपाला शेतीमुळे त्यांना आता याच क्षेत्रातून जवळपास 2.5 ते 3 लाख रुपये खर्च वजा करता नफा मिळत आहे. सदर शेतीकरीता आता कृषि विभागामार्फत रिसोर्स बँक शेतकरी म्हणून सुध्दा जोडण्यात आले आहे. त्यांना मिळालेल्या उत्पन्नापासून त्यांनी शासनाच्या महाडीबीटी पोर्टलद्वारे अर्ज करुन अनुदानावर सन     2021-22 मध्ये ट्रॅक्टर खरेदी केला आहे, तसेच एक एकर शेतीसुध्दा त्यांनी मिळालेल्या नफ्यातून खरेदी केली आहे. याकरीता त्यांनी कृषि विभाग व आत्मा यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे आपले मत व्यक्त केले आहे.