महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना जेईई मेन्स परीक्षेत मिळविले घवघवीत यश!

0
15

13 विद्यार्थी 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण

महाज्योतीच्या प्रशिक्षकांना दिले श्रेय!

            भंडारा दि. 13 : जेईई मेन्स ही अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणारी सर्वात मोठी परीक्षा आहे. देशभरातील आयआयटी आणि इतर प्रतिष्ठित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. नुकताच या परिक्षेचा निकाल जाहिर झालेला आहे आणि यात महाज्योतीतर्फे घेण्यात येत असलेल्या जेईई मेन्स प्रशिक्षण योजनेतील 13 विद्यार्थी 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण झालेले आहेत.

विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय महाज्योतीला आणि त्या माध्यमातून शिकवत असलेल्या सर्व प्रशिक्षक वर्गास दिलेले आहे. ज्यांनी नियमित, वेगवेगळ्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी जुळून त्यांना समजेल असे प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणातील अडचणी दुर सारुन वेळोवेळी त्यांच्या शंकेचे निरसन केले.

यावेळी मा.ना.श्री. अतुल सावे मंत्री, इतर मागास बहुजन कल्याण, सरकार तथा अध्यक्ष महाज्योती, नागपूर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच महाज्योती तर्फे राबविण्यात येणाऱ्या जेईई/नीट/एमएचटी-सीईटी या योजनेचा आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. मा. श्री राजेश खवले व्यवस्थापकीय संचालक महाज्योती, नागपूर यांनी जेईई मेन्स परीक्षेत उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

 उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मनोगत

मी आकांक्षा भलमे, गाव अल्लीपूर, जिल्हा वर्धा येथे राहते. जेईई मेन्स   परीक्षा पास करने माझे स्वप्न होते. पण यासाठी लागणारे महागडे क्लासेस लावणे शक्य नव्हते. तसेच ग्रामीण भागात परिक्षेच्या तयारीचे अन्य कुठले साधनही उपलब्ध नव्हते. त्यावेळी महाज्योतीच्या वेबसाइटवरुन मला जेईई मेन्स  या प्रशिक्षण योजनेची माहिती मिळाली. यात मी ऑनलाईन अर्ज दाखल केला. आणि माझी निवड झाली. या प्रशिक्षण योजनेमार्फत ऑनलाईन क्लासेससाठी मोफत टॅबसह, मोबाईल डेटा देण्यात आला. सर्व विषयांचा पुस्तकांचा एक संचही घरपोच देण्यात आला. ऑनलाईन क्लासेसची, पुस्तकांची, प्रशिक्षकांची जेईई मेन्स प्रशिक्षणास खुप मदत झाली. आज मी 98 ट्क्के मार्क घेऊन पास झाले. माझे इंजिनिअर बनण्याचे स्वप्न साकार झाले. यासाठी मी महाज्योतीच्या प्रत्येक घटकाचे आभार मानते.