भाजी पाला व फळबागेचा यशस्वी प्रयोग अरुण मुटकुरे यांची यशोगाथा

0
23

बी.एस.सी. शिक्षण घेतलेले अरुण पांडुरंग मुटकुरे राहणार देव्हाडी हे आपल्या नाविण्यपुर्ण प्रयोगशिल शेतीसाठी नावारुपाला आले आहे. सुरुवातीपासुनच पारंपारिक व प्रचलित शेती पध्दतीचा वापर न करता सुधारीत नाविण्यपुर्ण शेती पध्दतीकडे त्यांचा भर होता.

धान पिक बहुल भंडारा जिल्हयात वडीलोपार्जित धान पिक न घेता भाजी पाला व फळबाग यासारखी नाविण्यपूर्ण पिके त्यांनी घेवून जिल्ह्यातील शेतकऱ्यां समोर एक आदर्श ठेवला आहे.

अरुण मुटकुरे यांची मौजा देव्हाडी येथे 2.70 हेक्टर शेती असून त्यामध्ये व्हि. एन. आर. जातीच्या 710 पेरू कलमाची व 310 एपल, बोरीच्या झाडांची लागवड केली आहे. एकच फळबागेवर अवलंबून न राहता त्याचबरोबर फळबागेतील आंतरपिक म्हणून मिरची, मेथी, टोमॅटो सारखी पालेभाज्याची लागवड केली. त्याचबरोबर फळबागेमध्ये आंतर पिक म्हणून विविध भाजीपाला पिकाची लागवड केली जाते. आंतर पिकातुन मिळणा-या उत्पन्नामुळे फळबागेच्या उत्पादन खर्चामध्ये देखील बचत होते.

अरुण मुटकरे यांना फळबागेतून खर्च वजा जाता वर्षाकाठी 5 ते 6 लाख रुपये निव्वळ उत्पन्न मिळते. त्याचबरोबर सुधारित पध्दतीने मल्चींगवर मिरची पिकाची लागवड केली असून त्यापासून गुणवत्तापुर्ण मिरची ते दिल्ली बाजारपेठेत पाठवतात. त्यापासुन त्यांना एका हंगामात साधारण 2 ते 2.50 लाखापर्यंत उत्पन्न मिळते.

कृषि विभागामार्फत उत्पादन खर्च कमी होण्याच्या दृष्टीने त्यांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात येत असून कृषि विभागाच्या योजनेतुन पावरटिलर, रोटाव्हेटर, ठिंबक सिंचन तसेच प्लॅस्टिक मल्चिंगचा लाभ देण्यात आला आहे.

जिल्हयातील इतर शेतक-यांनी देखील धान पिक न घेता नाविण्यपुर्ण पिकाची लागवड करुन कृषि विभागाच्या मार्गदर्शनाप्रमाणे शेती करुन आपल्या उत्पन्नात वाढ करावी. असे  अरुण मुटकुरे यांनी इतर शेतक-यांना सांगीतले  आहे.

शैलजा वाघ-दांदळे, जिल्हा माहिती अधिकारी भंडारा