सूरजागड येथील लोह उत्खनन प्रकल्पात स्थानिकांना रोजगार देण्यास प्राधान्य – बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे

0
14

मुंबई, दि. २४ : सूरजागड, जि. गडचिरोली येथे सुरू असलेल्या लोह उत्खनन प्रकल्पात स्थानिक लोकांना प्राधान्याने रोजगार दिला जात आहे, असे बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. विधानपरिषदेत म. वि. प.नियम ९२ अन्वये झालेल्या चर्चेवर उत्तर देताना ते बोलत होते.

सूरजागड येथे गेले काही वर्षापासून लोह उत्खनन प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पामध्ये अवैध उत्खनन सुरू आहे. तसेच स्थानिक लोकांना रोजगार मिळत नाही. ज्या कंपनीद्वारे येथे उत्खनन होत आहे, तिथे संगणक प्रणालीद्वारे डॅशबोर्ड तयार करणे, जीपीएस आणि सीसीटीव्ही कॅमेराच्या मदतीने उत्खननाचे कार्य वैधरित्या केले जावे, अशी चर्चा म. वि. प.नियम ९२ अन्वये सदस्य अभिजित वंजारी यांनी सार्वजनिक महत्त्वाच्या बाबींवर उपस्थित केली होती.

मंत्री श्री.भुसे म्हणाले की, सुरजागड – एटापल्ली येथे 1993 पासून लोहखनिज उत्खनन केले जाते. मेसर्स लाईट मेटल्स ॲन्ड एनर्जी लिमिटेड या कंपनीला २००७ मध्ये काम देण्यात आलेले आहे. लोहखनिज उत्खनन ज्या कंपनीद्वारे सुरू आहे, त्यांच्या पाच वर्षे कामांची रूपरेषा ठरलेली आहे. 2008 -2009 ते 2020-21 मध्ये 4 लाख 49 हजार 463 टन इतके लोह उत्खनन करण्यात आले आहे, तर 2021,22 आणि 23 या वर्षात 57 लाख 59 हजार 528 टन इतके लोह खनिज उत्खनन करण्यात आले आहे. या खाणीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती केली जात आहे. 3209 लोकांना रोजगार प्राप्त झालेला आहे.

घुगुसाच्या खाणीत 900 टन दर दिवसाला उत्खनन होते. तिथे 1 हजार लोकांना रोजगार उपलब्ध होतो. या प्रकल्पाची क्षमता वाढवून 1300 टन रोज उत्खनन होईल. या ठिकाणी दोन हजार रोजगार वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. घोणसरी प्रकल्प एप्रिल-मे महिन्यामध्ये कार्यान्वित होईल. या प्रकल्पाच्या माध्यमातून 1500 लोकांना रोजगार उपलब्ध होईल. या ठिकाणी सुरू असलेल्या खाणीमध्ये 50 टक्के स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, यासाठी शासनाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक प्रशासनाने कार्यवाही केली आहे. शासनाला या खाणी मधून स्वामीत्वधन पोटी (रॉयल्टी पोटी) 390.10 लाख रुपये मिळाले आहेत. डी. एम. एम. फंडा साठी 107.50 कोटी निधी प्राप्त झाला आहे. एन मेट या फंडासाठी 6.42 कोटी मिळाले आहेत. सी एस आर मधून 6.25 कोटींची कामे करण्यात आलेली आहेत. या खाण प्रकल्पामध्ये कोणत्या प्रकारच्या त्रुटी असतील, तर त्याच्यावर कार्यवाही करण्यात येईल, असेही मंत्री श्री. भुसे म्हणाले.