डाळिंब पिकाने घेतली उड्डाणे; आधुनिक शेतीचे गाव ‘सातमाने’

0
25

नाशिक जिल्ह्यातील कसमादे भागात डाळिंब पिकाने गेल्या दोन दशकात समृद्धीची लाली खुलवली होती. मात्र, कालांतराने तेलकट डाग (तेल्या) रोगाच्या प्रादुर्भावामुळे टप्प्याटप्प्याने गावकऱ्यांनी उभारलेले वैभव कोलमडत गेले. या दुष्टचक्रात अनेक गावांमध्ये डाळिंब लागवड दिसेनाशी झाली. मात्र, असे असताना देखील राज्यात डाळिंब उत्पादनात नाशिक जिल्ह्यातील मालेगांव तालुक्यामधील ‘सातमाने’ या गावाचे नाव प्राधान्याने घ्यावे लागेल. कधी पिकांवर मोठ्या प्रमाणात रोगाची तर कधी निसर्गाची आपत्ती अशा अनेक संकटांचा सामना सातमाने गावातील शेतकऱ्यांनी खंबीरपणे व जिद्दीने केला. डाळींबासह द्राक्ष, शेवगा व भाजीपाला पिकात हे गाव फलोत्पादनात राज्यासमोर आदर्श गाव आहे.

मालेगाव तालुक्यातील दुष्काळी गाव असा शिक्का ‘सातमाने’ गावाच्या माथी असतांनाही सामाजिक एकोप्यामुळे दुष्काळासारख्या समस्यांवर मात करत गावाने कृषी क्षेत्रात यशस्वी वाटचाल केली आहे. गावातील यशवंत जीवन जाधव यांनी गावात पहिला ट्रॅक्टर खरेदी करून गावात यांत्रिकीकरणाच्या मदतीने विकासाची मुहूर्तमेढ रोवत गावाच्या विकासासाठी पहिले पाऊल टाकले. दुष्काळ निवारणासाठी जलसंधारणाच्या कामांच्या माध्यमातून केलेल्या कामांचे सकारात्मक परिणाम गेल्या काही दिवसांत समोर आल्याने गावात पाणी उपलब्ध होऊ लागले. श्री. जाधव यांनी गावात प्रथमच गणेश जातीची ६०० डाळिंब रोपांची लागवड केली. एकीकडे नव्याने काही करत असतानाच त्या दरम्यान दुष्काळ पडला. अशा प्रतिकूल व आव्हानात्मक परिस्थितीमध्येही त्यांनी झाडे जगवून पहिला बहार धरून उत्पादन घेतले. त्यावेळी प्रतिकिलोला २० रुपये दर मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला. ही बाब हेरली आणि डाळींब शेतीत सातमाने गावाची यशस्वी वाटचाल सुरु झाली ती आजही कृषी विभाग व राहुरी कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाने सुरूच आहे.

सिंचनाचे बळकटीकरण :

गावात डाळिंब लागवडीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर गावातील शेतकरी याबाबत माहिती घेऊ लागले. मात्र, खडकाळ व मुरमाड जमिनीमुळे अत्यल्प पाणी धरून ठेवण्याची क्षमता हा प्रश्न येथे होता. त्यामुळे पाण्याची उपलब्धता व पाण्याचा कार्यक्षम वापर ही काळाची गरज होती. डाळिंबांची झाडे जगविण्यासाठी कधी डोक्यावर हंडा, बैलगाडी अन कधी टँकरने पाणी देऊन बागा जगविण्याचा येथे इतिहास आहे. या दुष्काळी परिस्थितीवर मात करून सिंचन व्यवस्थापन काटेकोर होण्यासाठी ठिबक सिंचनाचा प्रथमच अवलंब करण्यात आल्याने ५० टक्के पाणी बचत शक्य झाली. त्यानंतर गावाने निर्णय घेत रावळगाव – सातमाने दरम्यान १८ हजार फुटांची पाईप लाईन आणण्यासाठी भगीरथ प्रयत्न केले. पाण्याचा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी शेतकऱ्यांनी मोसम नदीवरून ६ किलोमीटर अंतरावरून पाईप लाईन करून पाणी आणले. तर सामुदायिक शेततळे योजनेतून गावात ३०० हून अधिक शेततळ्यांची उभारणी केली, त्यामुळे गावात संरक्षित पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यातूनच ‘शेततळ्यांचे गाव’ म्हणून या गावाने जिल्ह्यात ओळख निर्माण केली असल्याने आजतागायत हे डाळिंब पीक या ठिकाणी टिकून आहे.

विविध वाणांची लागवड :

जलस्त्रोत निर्माण झाल्यामुळे विविध वाणांची लागवड तसेच डाळिंब पिकात नाविन्यपूर्ण प्रयोग करणे शक्य झाले. गावातील शेतकरी कौतिक दत्ता जाधव यांनी मृदुला, आरक्ता, जी-१३७ या जाती आणण्यासाठी प्रयत्न केले. सोबतच शेतकऱ्यांनी भगवा जातीची लागवड केली. तर आता भगवा व सुपर भगवा अशा दोन जातींची लागवड अधिक प्रमाणावर आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सटाणा तालुक्यतील लखमापूर येथील डाळिंब संशोधन व विस्तार केंद्राचे प्रमुख डॉ. सचिन हिरे यांच्यासह सुपर भगवा वाणाचे पैदासकार व सहयोगी संशोधन संचालक डॉ. विनय सुपे यांचेही मार्गदर्शन यापूर्वी लाभले आहे.

गावाची सामाजिक व आर्थिक उन्नती :

संघर्ष करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती, नाविन्यपूर्णता, शास्त्रीय प्रयोगांची अंमलबजावणी, एकमेकांच्या सोबतीने पुढे जाताना हेवेदावे बाजूला ठेऊन गुणवत्तापूर्ण डाळिंब उत्पादनात सातमाने गाव राज्यात नावारूपाला आले आहे. केवळ डाळिंब पिकामुळे या गावाने सामाजिक व आर्थिक परिवर्तन घडवून आणले आहे. वाण निवड, पीक नियोजन, व्यवस्थापन व बाजारपेठ मागणीनुसार गुणवत्तापूर्ण उत्पादनात सातत्य यामुळे या गावाने क्रांती केली आहे. सुरुवातीला अपुऱ्या सिंचन सुविधांमुळे सातमाने गावात पूर्वी ज्वारी, बाजरी अशी जिरायती पिके व्हायची. पिकांवर फवारणी देखील हातपंपाने करावी लागायची, परंतु आजमितीला लाखो रुपये किमतीची आधुनिक फवारणी

यंत्रे घरोघरी आहेत. या प्रयोगशील गावाला कृषी विभागाचे नेहमीच पाठबळ लाभले आहे. कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या सहाय्याने फळबाग लागवड, ठिबक सिंचन, पॅक हाऊस, तीनशेहुन अधिक शेततळी, ट्रॅक्टर यासह शेती अवजारे यांचा लाभ अनेक शेतकऱ्यांना मिळाला आहे.

“गाव करील ते राव काय करील” ही म्हण सर्वश्रुत आहे. याची प्रचिती सातमाने गावात नेहमी येते. येथील शेतकऱ्यांनी संघटीत होऊन काम करण्यावर भर दिला आहे. गावात सेवन क्रिस्टल, सातमाने व भगवती या नावे तीन फार्मर प्रोड्युसर कंपन्यासह आत्माचे दोन शेतकरी गट कार्यरत आहेत. तसेच बांगलादेश, आखाती देशांसह काही युरोपियन देशांमध्ये डाळिंब निर्यात होत आहे. यासोबतच नवीन प्रयोगशील पिढी उत्पादनासह बाजारपेठ मिळविण्यासाठी काम करत आहे. डाळिंब पिकाने या गावाला सुबत्ता दिली असून त्यामुळेच शेतकऱ्यांच्या कष्टाचं चीज झालेलं सहजपणे दिसून येते. शेतात टुमदार बंगले आणि घरासमोर चार चाकी वाहने ही त्यांच्या कष्टाची जणू प्रतिकेच आहेत. ‘निर्यातक्षम डाळिंब उत्पादकांचे गाव’ म्हणून सातमाने गाव नावारूपास येत आहे.

०००

  • अर्चना देशमुख, माहिती अधिकारी,,जिल्हा माहिती कार्यालय, नाशिक