ज्वलंत समस्यांना मार्गी लावा : प्रदीप पडोळे

0
10

उपविभागीय अधिकाऱ्यांना भाजपचे निवेदन,आंदोलनाचा इशारा

तुमसर : शहरात सध्या अनेक समस्यांनी आपले तोंड वर केले आहे. त्यात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, बाजार परिसरातील स्वच्छता, ठोक बाजाराचा मुद्दा, गाळ साचून खचलेल्या नाल्या, पावसाळ्यात संवेदनशील ठरणारे प्रभाग खंड तसेच डासांचा वाढलेला प्रादुर्भाव व मोकाट जनारवांचे मुख्य रस्त्यावरील बस्तान यांचा मुख्यत्वे समावेश आहे. मात्र अश्या ज्वलंत समस्यांना नगर परिषद प्रशासन दुजोरा देत वेळ काढू भूमिका बजावत आहे. नेमक्या त्याच समस्यांना धरून भारतीय जनता पार्टी तर्फे माजी नगराध्यक्ष इंजी प्रदीप पडोळे तसेच शहर अध्यक्ष पंकज बालपांडे यांच्या अध्यक्षतेखाली नप प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी बी वैष्णवी यांच्या कार्यालयाचा घेराव करण्यात आला. प्रशासक म्हणून शहरातील ज्वलंत समस्यांना तत्काळ मार्गी लावा अन्यथा भाजप मोठे आंदोलन उभारेल अशी भूमिका त्यावेळी पडोळे यांनी व्यक्त केली. पावसाळ्यात शहरातील काही ठराविक प्रभाग पाण्याखाली येतात. त्यावर उन्हाळ्यातच पर्यायी सुविधा व उपाय योजना राबविल्यास स्थानिकांना त्याचा त्रास सहन करावा लागणार नाही. तसेच नवीन भूमिगत पाणी पुरवठा करणारी यंत्रणा सज्ज असताना शहराला दूषित पाण्याचा पुरवठा का केला जातो? आरोग्य विभागाने लाखो रुपयांचे औषधी फवारणी खरेदी केली असताना शहरात डासांचा प्रादुर्भाव वधारलेला कसा? येथे यंत्रणा लोकांच्या हीतार्थ काम का करत नाही? अनुभव म्हणून पडोळेंनी शहरातील समस्यांवर बी वैष्णवी यांच्याशी पर्यायी सुविधा तसेच सभाव्य उपाय योजनांवर चर्चा देखील केली. सकारात्मक भूमिका घेत बी वैष्णवी यांनी प्रत्येक मागणीवर जातीने लक्ष देऊन काम केले जाणार असल्याचे आश्वासन दिले. त्यावेळी भाजपचे तुमसर शहर अध्यक्ष पंकज बालपांडे, जी.प.सदस्य बंडूभाऊ बनकर, जिल्हा सचिव आशीष कुकडे,युवा मोर्चा अध्यक्ष पवन पाटील, अन्नू रोचवाणी, सौ.कुंदाताई वैद्य,राजकुमार मरठे,अखिल चकोले,शुभम मिश्रा, कृष्णा पाटिल,दिनेश ढोके,अनुज मलेवार आदी उपस्थित होते.