आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन भाजीपाला पीक लागवड

0
29

मधुलिका पटले यांच्या शब्दात ऐकूया त्यांची यशोगाथा…

       प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी शेती हे अत्यंत फायदयाचे क्षेत्र ठरत आहे. नियमीत नवनवे प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना शेती साथ देते. पारंपारिक पीक पध्दतीला शेती साथ देईल असे होत नाही. हीच प्रयोगशिलता किडंगीपार ता.जि.गोंदिया येथील श्रीमती मधुलिका भाऊराव पटले या महिला शेतकऱ्याने जोपासली व भाजीपाला शेतीतून लाखोचे उत्पन्न मिळविले. भाजीपाला शेतीचा हा प्रयोग नगदी पिकाचा आहे. मधुलिका पटले या प्रयोगातून आर्थिक सक्षम व आत्मनिर्भर झाल्या आहेत. ही शेतकरी आता आजुबाजूच्या परिसरात एक उत्कृष्ट अशी शेतकरी बनली आहे.

      मी मधुलिका भाऊराव पटले मौजा किडंगीपार, ता.जि.गोंदिया येथील शेतकरी आहे. मला कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडून रो.ह.यो. अंतर्गत फळबाग लागवड योजनेमध्ये 1.00 आंबा लागवडीचा लाभ 10 ते 15 वर्षापुर्वी मिळालेला आहे. त्यामध्ये मी आम्रपाली व रत्ना या वाणाची लागवड केली आहे. फळबाग लागवडीपासून मला दरवर्षी खर्च वजा जाता 1 लाख रुपये उत्पन्न मिळत आहे.

         मला पंतप्रधान कृषि सिंचन योजना सन 2021-22, 2022-23 अंतर्गत 2.00 हेक्टरचा ठिबक सिंचनाचा लाभ मिळालेला आहे. तसेच एकात्मिक फलोत्पादन योजना सन 2022-23 अंतर्गत 2.00 क्षेत्रासाठी प्लॉस्टिक मल्चिंगचा सुध्दा लाभ मिळाला आहे. यापुर्वी आम्ही शेतात भाजीपाला पिकास पारंपारीक पध्दतीने पाणी देत होतो. त्यामुळे मला वेळेवर पाणी देता येत नव्हते. पाणी सुध्दा कमी पडत होते. परंतु कृषि विभागाकडून जेव्हापासून  ठिबक संचाचा लाभ घेतला तेव्हापासून 25 ते 30 टक्के पाण्याची बचत होऊन पाण्याची कमतरता भासत नाही. तसेच मल्चिंगसाठी सुध्दा अनुदान मिळाल्यामुळे भाजीपाला लागवड करतांना तण नियंत्रणाच्या खर्चामध्ये बचत झाली आहे. तसेच इतर खर्चात सुध्दा बचत झाली. मल्चिंग व ठिबक संचामुळे मला चांगल्या प्रतीचा भाजीपाला घेता येत आहे.

         शेतीमध्ये आधुनिक पध्दतीचा वापर केल्याने उत्पादनात लक्षणीय वाढ झालेली आहे. कृषि विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मी आपल्या शेतामध्ये सध्या मल्चिंगवर टमाटर 1.00 हेक्टर, सिमला मिरची 1.00 हेक्टर व कारले 0.50 हेक्टरवर लागवड करीत आहे. या भाजीपाला पिकापासून मला उत्पादन खर्च वजा जाता एका हंगामामध्ये 2 लाख 50 हजार रुपये उत्पन्न मिळत आहे. याकरीता मी व्यक्तीश: महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाचे आभार व्यक्त करते असे त्यांनी प्रत्यक्ष भेटी दरम्यान सांगितले.

  – के. के. गजभिये, उपसंपादक, जिल्हा माहिती कार्यालय,गोंदिया­