बोरगावच्या तीन सख्ख्या बहिणी पोलिस दलात

0
24

सोलापूर-आजही भारतीय संस्कृतीमध्ये मुलगा – मुलगी यामध्ये मुलाला प्राधान्य दिले जाते. तशी मानसिकता असणारी अनेक उदाहरणे आपल्या आसपास आहेत. मात्र या वृत्तीला छेद देत मुलगी सुद्धा वंशाचे नाव रोशन करू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे बार्शी तालुक्यातील दोन जिल्ह्याच्या हद्दीवरील ६०० ते ७०० लोकसंख्येच्या बोरगाव (झाडी) येथे पाहावयास मिळते.येथील ज्योती, प्रीती, प्रियांका पांडुरंग लंगोटे या तिन्ही सख्या बहिणींनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलिस होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.

बोरगाव (झाडी) हे सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्याच्या सरहद्दीवरील बार्शी तालुक्यातील शेवटच्या टोकाचे गाव आहे. वाहतूक व दळणवळण तसेच शैक्षणिकदृष्ट्या कोसो दूर असलेल्या या गावात शेतकरी कुटुंबातील पांडुरंग लंगोटे यांना एकूण पाच अपत्ये. साडेतीन एकर शेती आहे. पत्नी पद्मिनी अंगणवाडी सेविका आहे. यावर जेमतेम प्रपंचाचा गाडा ते चालवीत असे. असे असतानाही त्यांनी आपल्या तीन मुली व दोन मुलांना उच्च शिक्षित केले. मुलगा व मुलगी असा भेदभाव न करता तिन्ही मुलींना शिक्षण देत स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी खंबीर साथ दिली. तिन्ही मुलींचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आहे.

सर्वात मोठी मुलगी ज्योतीने कृषी पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. एका नातेवाइकांच्या सल्ल्यावरुन तिचा पोलिस भरतीसाठी फॉर्म भरला अन्‌ पहिल्याच प्रयत्नात तिला यश मिळाले.२००७ मध्ये ती पोलिस दलात पोलिस सेवेत दाखल झाली.तर तिची दुसरी बहिण प्रीती मोठ्या बहिणीची प्रेरणा घेऊन २०११ मध्ये पोलिस सेवेत दाखल झाली. प्रीतीने डी.एड. शिक्षण पूर्ण केले आहे. यानंतर मात्र तिसरी मुलगी प्रियांका हिला पोलिस भरतीसाठी अनेक ठिकाणी प्रयत्न करावे लागले. तिने मुंबई, सोलापूर तसेच रेल्वे पोलिस भरतीसाठी खूप प्रयत्न केले.

तिला पोलिस भरतीसाठी अॅकॅडमी देखील लावली होती. तिने बीएपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. आपल्या बहिणींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत लग्नानंतर तिनेही २०२३ मध्ये नुकत्याच झालेल्या पोलिस भरती प्रक्रियेत यश संपादन करत पोलिस सेवेत प्रवेश केला. त्यामुळे सुरवातीला ज्योतीने पोलिस सेवेत दाखल होऊन पेटविलेली ज्योत तिच्या बाकीच्या दोघी बहिणींनीही तशीच तेवत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

सध्या या तिन्ही बहिणी पोलिस दलात कार्यरत आहेत. यामध्ये ज्योती सोलापूर शहर पोलिस दलात तर प्रीती व प्रियांका या दोघी सोलापूर ग्रामीण पोलिस दलात कार्यरत आहेत. त्यांना दोन भाऊ आहेत. नितीन हा मेकॅनिकल इंजिनिअरची पदवी घेऊन उस्मानाबाद येथे एसटी महामंडळात कार्यरत आहे. तर दुसरा भाऊ रोहित बीएस्सी अॅग्रीचे शिक्षण पूर्ण करून स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे.

पद्मिनी व पांडुरंग या दाम्पत्याला आपल्या तिन्ही मुली पोलिस खात्यात चांगल्या प्रकारे कर्तव्य पार पाडत असल्याचा सार्थ अभिमान आहे. ज्योती यांचे पती एसआरपीमध्ये कार्यरत आहेत. प्रीतीचे पती शिक्षक आणि प्रियांका यांचे पती देखील सोलापूर येथे पोलिस म्हणून कार्यरत आहेत. बोरगाव येथे छोट्याशा खेड्यात सध्या एकूण पाच महिला पोलिसांची संख्या आहे.

साडेतीन एकर शेतीच्या तुकड्यावर संसाराचा गाडा ओढत असताना तीन मुली व दोन मुलांना शिक्षण देताना खूप कष्ट सहन करावे लागले. आम्ही केलेल्या परिश्रमाचे मुलींनी पोलिस दलात दाखल होऊन चीज करून दाखवले.
 पांडुरंग लंगोटे, बोरगाव (झाडी), ता. बार्शी