नागपूर, दि. 5 जून 2024:– महावितरणची स्थापना 6 जून 2005 रोजी झाली. तेव्हापासून, महाराष्ट्रातील वीज वितरण क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यासाठी या कंपनीने लक्षणीय प्रगती केली आहे. महावितरणने गेल्या 19 वर्षांत लक्षणीय प्रगती केली आहे. तरीही, अनेक आव्हाने आहेत जी कंपनीला तोंड द्यावी लागतील. स्मार्ट तंत्रज्ञान आणि नवीन ऊर्जा स्त्रोतांवर लक्ष केंद्रित करून, महावितरण महाराष्ट्राला ऊर्जेच्या बाबतीत आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि ग्राहकांना उत्तम सेवा प्रदान करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
आकडे बोलतात :
देशातील सर्वात मोठी वीज वितरण कंपनी असलेली महावितरण राज्यात 46 हजार 247 तांत्रिक आणि 9 हजार 472 अतांत्रिक कर्मचा-रांच्या मदतीने राज्यातील सध्या 3 कोटी 7 लाख 90 हजार 91 ग्राहकांना वीजपुरवठा करते. तत्कालिन महाराष्ट्र विद्युत मंडळाच्या विभाजनानंतर अस्तित्वात आलेल्या महावितरणमध्ये तेव्हा 1 कोटी 33 लाख 77 हजार वीजग्राहक होते. महावितरणने मागिल 19 वर्षात राबविलेल्या पायाभूत आराखडा विकास, कृषीपंप ऊर्जीकरण, दिन दयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना, एकात्मिक ऊर्जा विकास योजना, उच्चदाब वितरण प्रणाली आणि विविध योजने अंतर्गत वीजयंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणामुळे महावितरणच्या ग्राहकांचा वीजवापर गेल्या 19 वर्षांत 300 टक्क्यांपेक्षा अधिकने वाढला आहे. महावितरणमध्ये राबविण्यात येत असलेल्या सुधारीत वितरण क्षेत्र योजना व मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनांमुळे राज्याच्या ऊर्जा क्षेत्राचा कायापालट होतो आहे. सन 2005 मध्ये असलेली घरगुती वीजग्राहकांची 96 लाख 72 हजार 512 ग्राहकसंख्या आता 2 कोटी 29 लाख 31 हजार 524 वर गेली आहे. गेल्या 19 वर्षांत 10 लाख 2 हजार वाणिज्यिक वीजग्राहकांची संख्या आता 22 लाख 58 हजार 382 वर गेली आहे. औद्योगिक ग्राहकांच्या संख्येत वाढ झाली असून 2 लाख 25 हजार 379 ग्राहकसंख्या आता 4 लाख 80 हजार 502 झाली आहे. याशिवाय सन 2005 मधील 22 लाख 86 हजार कृषीपंप ग्राहकांची संख्या आता 47 लाख 41 हजार 208 झालेली आहे.
पायाभुत सुविधा:
ग्राहकांना वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणची राज्यात तब्बल 4 हजार 209 वीज उपकेंद्र आहेत, 25 हजार 989 वीज वाहिन्या तर 9 लाख 19 हजार 745 वितरन रोहीत्रे आणि 6 हजार 572 पॉवर ट्रान्सफ़ॉर्मर आहेत. 3 लाख 84 हजार 243 किमी ची उच्चदाब आणि 6 लाख 76 हजार 836 किमीची लघुदाब वीज वाहीनी आहे.
ग्राहक सेवा:
राज्यभरातील औद्योगिक ग्राहकांच्या दारी जाऊन तत्पर ग्राहकसेवा देण्यासाठी महावितरणकडून प्रत्येक जिल्ह्यात ‘स्वागत सेल’ सुरु करण्यात आले आहेत. याद्वारे औद्योगिक ग्राहकांना नवीन वीजजोडणी, इतर वीज सेवा देण्यासाठी बिलिंग व वीजपुरवठ्याच्या तक्रारींचे ताबडतोब निराकरण करण्यात येत आहे. याशिवाय कृषिपंप वगळून उर्वरित सर्व वर्गवारीतील ग्राहकांना तात्काळ नवीन वीजजोडणी किंवा वीजभार वाढवून देण्यासाठी आवश्यक पायाभूत वीजयंत्रणा उभारण्याचे काम महावितरणकडून करण्यात येत आहे. त्यामुळे वीजग्राहकांना तात्काळ नवीन वीजजोडणी उपलब्ध होणार आहे. तर आदिम जमातींच्या सर्वांगिण विकासासाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान (पीएम जनमन) या योजनेत राज्यातील दुर्गम भागातील आदिम जमातींच्या 2,395 घरांना वीज पुरवठा करण्याचे उद्दीष्ट महावितरणने केवळ बारा दिवसात पूर्ण केले. मुख्यमंत्री सौर कृषी वाहीनी योजना, इलेक्ट्रीक चार्जींग स्टेशन, सोलर रु टॉप वाहन, अक्षय ऊर्जा पोर्टल , ऑनलाईन तक्रार नोंदणी, प्रिपेड मीटर, ऊर्जा चॅटबॉट यासारख्या ग्राहक सेवा उपलब्ध करुन देत महावितरण अधिकाधिक लोकाभिमुख होत आहे
उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर